शुक्रवार, २७ जून, २००८

पावुले मोजीत जा...


पावुले मोजीत जा एकटा क्षितिजाकडे,
सावलीत आपुल्या पेरीत ऊन कोवळे.

तू चालतो दिशा जरी, न चालताच थांबतो.
थांबत्या त्या क्षणांना नकोच घालू साकडे.

'सुख-दुखः' ही कालची आणि आठवांचे बोचके,
नकोस छेडू पुन्हा ही उन्मत्त अवली माकडे.

जे थांबले मागे... तुझे न, राहिले येतील ते,
गेले पुढे , जाऊ दे ती,... आपलीच बापडे.

कोण आहे मात्र तुझा, कोण किती स्वार्थी रे.
का उगाच गुंतवावे प्रश्नांमधे आकडे?

तुझ्यासवे चालती शब्द सूत्र आजची
नको उगाच ठोठावू ती उद्याची कावडे.

भीड़ता कुणी,... भीडावे, अड़ता तू तोड़ रे.
मार्गस्थ हो तू उषेचा, दुर्लक्षूनी जखमांकडे.

पावुले मोजीत जा एकटा क्षितिजाकडे...
सावलीत आपुल्या पेरीत ऊन कोवळे.

---भूराम

बुधवार, २५ जून, २००८

आज येशील ना सखे


आज आभाळ सावळे
माझा गुंतलेला श्वास
क्षणे दिठिच्या कडेला
होई पावसाचा भास.

आज पावलांची होते
कशी रवारव निळी.
त्याच्या दबक्यापणाला
तुझ्या वाटेची गं आस.

किती दिस झाले सखे
नाही भेटला पाऊस,
तुझ्या मीठीमधे माझा
नाही भीजला पाऊस.

किती दिस झाले सखे
नाही भीजला गं वारा
देह दिशांचा करून
नाही कोराला गं तारा.

आज येशील ना सखे
स्वप्न सुखाचे घेवून.
येता थेंब सरी संगे
आण मृदूगंध ख़ास.

--भूराम

खुळ

photograph by Surendra Mahajan.
ईश्वर ईश्वर कोण तो ईश्वर? ईश्वरतेचा वाद का?
जन्मले माणूस तुम्ही , माणुसकीची दाद दया.

धर्म धर्म कोण तो धर्म? धर्मांमधे भांडणे!
जगा आणि जगू दया, हेच तुम्हाला सांगणे.

जातीपाती, कोणती माती? कशी त्यातली श्रेष्ठता!
जन्मले योनितून सारेच, न कळे प्रश्नातील मुर्खता!

स्त्री पुरूष करता तुम्ही, कोण वरचढ मानता?
एकमेकास पूरक दोन्ही,नाही कसे हे जाणता!

'मी-माझा' अहंकार तो, 'अहं' सारयांचे मुळ ते,
लिंग, जात, धर्म, आणि देव अहंकाराचेच खुळ ते.

-भूराम

शुक्रवार, २० जून, २००८

काव्यतेचा शोध...



कोण तो कोठे तो आहे, एकटा क्षितिजाताला!
काय तो शोधून पाही, भाव ह्या हृदयातला!
सांधणे जगण्यास माझ्या, जाणिवा शोकातली,
रोज मी तोडून पाही स्वार्थ ह्या जीवनातला.

प्राण कंठातून येता भान देतो आजचे.
अन् जगां ठावूक आहे काय माझ्या काजचे!
रंग रंग बांधलेले,... यौवनेही गांजली,
शोध तो घेतोच आहे, 'भावत्या' हृदयातला!

मी जरासा शांत झालो, शांतता ही गोठली.
मी मनी आकांत केला, अन् आसवेच दाटली.
शब्द मी मोजून घेई, मोजतोय अर्थही.
भाव तो आसक्त आहे, काव्य शोधण्यातला.

--भूराम

श्री चंद्रकांत गोखले यांना श्रद्धांजली!!


वाचलं आणि त्यांचा पुरूष ह्या नाटकातील मास्तर डोळ्यांसमोर येऊन गेला. डोळ्यातले भावः आणि सुरकुत्यातल्या वेदना मनाला भिडून गेल्या.
माझी त्यांना ही भावपूर्ण श्रध्दांजलि...
========================
आज तो आहे इथे, आज तो नाही इथे,
साऊलीतील चालली आठवणींची गीते.
कोणत्या शब्दातली भावना मी ओळखू?
ओळखीच्या वास्तवास आज तो गेला तिथे.
मौन झाली चांदणे मोजता सुखातली,
पाऊलास ढेचते वेदना नखातली.
माणसास अत्तरून सोडूनी गेला कथे!
ओळखीच्या वास्तवास आज तो गेला तिथे
भ्रम उद्याचा साकारुन जिंकलेला आज तो.
कापलेल्या शब्दातून ऊराऊरात गाजतो.
उभारले नाट्य हे, अन्... आज तो नाही इथे!
ओळखीच्या वास्तवास का असा गेला तिथे?
--भूराम

बुधवार, १८ जून, २००८

प्रश्न (एक चारोळी/तिरळा )


'कर्णं व्हावं की अर्जून?' सारखाच प्रश्न पडतो.

कर्णं घडविणारा सूर्य नेहमी समोर असतो.

अर्जून जिंकविणारा कृष्ण कधी कधीच दिसतो!




--भूराम

मंगळवार, १७ जून, २००८

बेकार... (एक दिनचर्या)

संध्याकाळ सारी मित्रांसंगे
गप्पा गप्पात सरून जाते.
रात्र सारी स्वप्नांमधे
सजून धजून विझून जाते.
सकाळ ताज़ी वर्त्तमानपत्रात
भविष्य शोधून थकून जाते.
दुपार मात्र पायात पेटून
संध्याकाळची वाट पहाते.
संध्याकाळची वाट पहाते...

--भूराम.









Photograph by: Rajkumar Narkhede

रविवार, १५ जून, २००८

...मिलन...


नीळे आभाळ दिठीत, तुझ्या चंदनी मिठीत,

उरे धडधडे गीत, ओठे उष्टावली.


तृप्त आगर सुखाचे, नख त्याला न दुखाचे,

मन सधन पंखांचे, जन्मे ओलांडली.


न्हातो पाऊस सरींचा, गार वारा लहरींचा,

देह वितळे मेणाचा, हरवले स्वत्व.


तुटे जग माया बंध, नाही सभोवाचा गंध,

लख्ख आनंद आनंद, उजविला भगवंत.


कैसे तन्मये हे ध्यान, आत्मे आत्मा एकलिन,

दृढ योगया जे कठिण, आम्ही साधीयेले.

--भूराम.

तुटलेले बिंदू






सिकोया नेशनल पार्क(कैलिफोर्निया) गेलो असतांना, तेथे क्रिस्टल केव्ह च्या बाजूला एक छोटासा धबधबा(/झरा) आहे. त्या खाली उभे राहिलो आणि वर पाहिलं. कोसळणारया पाण्यातून थेंब तुटून पडल्या सारखी दिसत होती तेव्हा सुचलेली ही कविता.



photograph by Surendra Mahajan.

तुटलेले बिंदू ते कोसळती मनभरते,
स्वच्छ, शुभ्र, आनंदी, गायी गीत झुळझुळते.
सभोवतीचे विश्व जणू स्तब्ध धुंद गाण्यात,
वाहवा ही दाद की पक्षांचे किलबिलते!

खडकांच्या झोळीत क्षण रोमांची थरथर.
किरणांच्या स्पर्शानी सप्तरंगी क्षणभर.
क्षण हिरव्या इर्षेने पालवीवर ढुक धरते.
तुटलेले बिंदू ते कोसळती मनभरते...

तान नीळी उधळावी क्षितिजाच्या ओढीत,
स्पर्शे वारा झगडावी कधी लाडीक छेडीत.
काय अदा अहाहा ही जणू उरात धडधड़ते.
तुटलेले बिंदू ते कोसळती मनभरते...

स्वछंदी भाव जणू मिलनाची हाव नसे,
साथी जे छेडू तया पूढचाच मार्ग असे.
'अडथळ्यात सौदर्य', मन माझे बघ म्हणते.
तुटलेले बिंदू ते कोसळती मनभरते...

--भूराम.

शनिवार, १४ जून, २००८

प्रयत्नच सांगतात...

प्रयत्नच सांगतात कुणास किती गती,
बसून बोलणारयाना फक्त बोलण्यां इतकीच मती.
भिऊ नकोस अंधाराला, काही अंधार तुला खात नाही.
कारण थांबणारयांनाच असते अंधाराची भिती.
प्रयत्नच सांगतात कुणास किती गती...

तू पाऊस घेऊन आलस तर भीजत नाचतील मुलं.
तसाच निघून गेलास तर तुलाच कोसतील मूलं.
जगाची हया इथल्या अशीच असते नीती.
प्रयत्नच सांगतात कुणास किती गती...

म्हणून माझं तुला एकच आहे सांगणं,
न थांबता तू सतत प्रयत्न करणं.
मग तुला अडविण्याची कुणा होईल छाती.
प्रयत्नच सांगतात कुणास किती गती...

--भुराम.

इतकं माझं वय नाही...

मी तुला आयुष्य देतोय, मागण्याची सवय नाही.
जगण्यावरती प्रेम करावं इतकं माझं वय नाही.

पोटात माझ्या दुखु लागतं कुणी मला देता काही,
बोटांवर मग मोजू लागतो किती कर्ज डोकी होई.

तुझं माझं करण्या इतपत शहाणपण मला आलं नाही.
म्हणता कुणी हे माझच चटकन त्याला देता होई.

तूही म्हणतेस असं करता जिवंत राहता येणार नाही,
गरीबांच्या या जगात श्रीमंत होता येणार नाही.

तू जे म्हणतेस असेल खरही पण मला त्याचं भय नाही,
कारण... जगण्यावरती प्रेम करावं इतकं माझं वय नाही.

--भूराम

माणुस् कळू दे...

मज् मिळू दे मिळू दे, नवे आभाळ मिळू दे.
मी जन्मलो माणूस्, मज् माणुस् कळू दे.

देह अनावर होतो ह्या भुलाव्यात खरं,
ह्या भुलाव्याचा आता मज आकार कळू दे.

मी चालतो जी वाट मज आहे अनोळखी,
ह्या वाटेलाच आता मी कोण ते कळू दे.

का पिसाट मी होतो इथे तिथे नको तिथे.
याच पिसाटपणाने ध्येय दिशेला वळू दे.

जिथे मिळतो ओलावा, तिथे अंकुरालो मी,
या अंकुराला आता पूर्ण वृक्षात घडू दे.

मी माणुसच याची कर्मच देतील साक्ष,
या साथीने देहाला नव्या कक्षेत ढळू दे.

अंती रडू दे रडू दे साऱ्या जगाला रडू दे,
मज मृत्युने गाठता उभे आभाळ गळू दे.

मज् मिळू दे मिळू दे, नवे आभाळ मिळू दे.
मी जन्मलो माणूस्, मज् माणुस् कळू दे.
--भुराम

मी एक गुन्हा केलाय...

मी एक गुन्हा केलाय, तू सुध्दा करशील.
माझ्यासाठी जगण्याकरीता तू एकदा तरी मरशील.

प्रेम या शब्दाला तू ओठांवरती तोलू नको.
मला नाहि जमणार काही अशी मुर्खासारखी बोलू नको.

सारं काही जमेल तूला एकदा प्रेम तरी कर.
प्रेमाचा तो पळभर् ओला श्वास तरी धर.

मग कळेल् तुल ते ह्रदय काय् असतं.
ह्रदयाचं ते विषम धडधडणं काय असतं.

मग कळेल् तूला ते रडणं काय् असतं.
रात्री चन्द्राशी एकटं बड्बडणं काय असतं.

मग मी जे बोललो ते तू सुध्दा बोलशील.
माझ्यासाठी जगण्याकरीता तू एकदा तरी मरशील.
माझ्यासाठी जगण्याकरीता तू एकदा तरी मरशील...


---भूराम.

बुधवार, ११ जून, २००८

... पाऊस-गीता ...


ह्या इथलं आभाळ सांग कसं होतं,
पाऊस घेऊन दाटलेलं की ठिकठिकाणी फाटलेलं?
जमलेल्या चांदण्यांना कवेत घेऊन
अनेक बरया वाईट आठवनींच कोसळण्यासाठी गोठलेलं?
कुठं भेगा होत्या, कुठं चीरा होत्या,
कुठं वेदना वाहून नेणारया स्पष्ट दिसणारया शीरा होत्या.
प्रेम झुळकीच्या ओढीने डोळ्यांगत व्याकुळलेलं!...
सांग इथलं आभाळ कसं होतं?...


तुला काय ठाऊक म्हणा!...
चांदण्यांच्या प्रकाशाने दीपून जाणारी तू,
स्वप्नांच्या कोषातच पाऊस झेलणारी तू.
ओंजळभर थेंबांनी श्रीमंत होणारी तू.
आठवणींच्या जगात अगदी सहज वावरणारी तू!
तुला काय माहित म्हणा!...
इथलं आभाळ ते कसं होतं?


ती म्हणाली...
आभाळाचं काय घेऊन बसलास चांदण्यांकडे बघ.
गडगडणारया ढगां पेक्षा चमचमणारया जगाकडे बघ.
आनंद कसा शोधावा मग तो कसा जगावा ते माझ्याकडून शिक.
ओंजळभर का असेना ते मला गावलेलं होतं.
माझ्या हक्काचं हे जीवन मला पावलेलं होतं.
शंकेचं ते काळभोर, ठिकठीकाणी कुरतडलेलं तुझं आभळं ज़रा फुंकून बघ.
भेगा,चीरा आणि क्षीरा बघणारे तुझे डोळे ज़रा पूसून बघ.
गोठलेलं ते तुझं आठवणीनंच जग बघ मग कसं बरसू लागतं!
त्याच्या निळ्याशार श्रीमंत थेंबांनी बघ कसं हसू लागतं!


तिची पाऊस-गीता बरसतच होती,
आणि मी ही चिंब झालो होतो
हिरव्यागार आठवाणीत सहझ वावरत!...

---भूराम

मंगळवार, १० जून, २००८

माणूस म्हणून जगण्यासाठी...


माणूस म्हणून जगण्यासाठी माणसाकड़े बघत रहा.

माणसा माणसातील दुरावा मोजून मोजून चालत रहा.

आज काही उदया काही , बोलतो काय करतो काही,

चालण्या बोलण्यातील संबंध पुन्हा पुन्हा शोधत रहा.

माणूस म्हणून जगण्यासाठी...


सुख दुख्खांचा खेळ जीवनामधे चालूच असतो,

उजेड अंधाराचा मेळ प्रत्येक माणूस खालतच असतो.

अंधारातही हसण्यासाठी झोपड्यांमधे शिरत रहा.

माणूस म्हणून जगण्यासाठी माणसाकड़े बघत रहा.


एक थेँब पावसाचा, तो एक थेँब घामाचा,

एक थेंब आसवाचा, तो एक थेँब रक्ताचा.

प्रत्येक थेंबात एकेक करत, कळत नकळत भिजत रहा.

माणूस म्हणून जगण्यासाठी माणसाकड़े बघत रहा.

-भूराम...

तो पाऊस


तो पाऊस मला कालच भेटला, अंगावरून निथळतांना,
म्हणतो आज न आली मजा, एकटं तुला भीझवतांना.

मी मग मुकाच झालो, पापण्या आताच पाणावल्या,
तू असावी जवळ अशाच काही खुनावल्या.

तू आहे तिथे सुखी रहा, आहे तशी सुखिच रहा.
आपल्या प्रेमाबद्दल मात्र जगामध्ये मुकिच रहा.

मीही आता मुकाच असतो ती भिंत मात्र बोलत होती,
त्यावर कोरलेली नावं दोन राझ आपलं खोलत होती.

भिऊ नकोस आता तीही दिसणार नाहीत,कारण त्यावर शेवाळ आलय.
पाऊसाने हे एकच काम न बोलता केलय...
पाऊसाने हे एकच काम न बोलता केलय...



---भूराम.