रविवार, १६ डिसेंबर, २०१२

||जगणे आहे||

ओंजळीतले घरटे तुटले,
काज निळेशे काहूर फुटले
जखमांची ती खपली त्यावर
आसवेच ही, चरचर रुतले.

कोण म्हणावा दिडदा आणि
की गंजलेली खरखर म्यांनी.
नाद कळेना कुठला आहे,
जीवन गाणे असेच म्हटले.

आज काहीसे थांबून बघतो,
ते गेलेले वैभव जगतो,
त्या तुटल्या घरट्यावर मग
किती श्वास बघ असेच सुटले.

सार बाजूला जगणे आहे.
सुर्य उद्याचा बघणे आहे.
गेली नाही उमेद अजुनी.
झोप आता तू डोळे मिटले.
...
ओंजळीतले घरटे तुटले....

-भूराम
12/16/2012

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२

भोई

रानधुळीचा साजण
साद घालितो एकाकी
त्याच्या सभोवाला होती
सांज प्रेमाची लकाकी.

प्राण पांघरून येते,
चांद नदीची किनार.
त्यात भिजलेला होतो
त्याच्या डोळ्यातील पार.

दूर देखणे शिवाचे
दिसे एकले देऊळ
देह थकलेला त्याचा
वाट झालेली गढूळ.

चालताना गुणगुणे तो
गाणे पालखीचे गोड.
दूर झालेले कितीक
मना सोबतीला ओढ.
...
गाणे पालखीचे गोड,
मना सोबतीला ओढ.

-भूराम
१२/१४/२०१२

बुधवार, १२ डिसेंबर, २०१२

हळद


आभाळ धुळीशी, पाउस पल्लव
सांजत्या धरेला जडते निरव
वाटेत सोनेरी कोसळावे दवं
दाटता उरात मायेचे आठव.

पाखरले थवे, चाहूल नविशी
चांदण दिशेला ओढ ही हवीशी,
तुटते काहीसे जोडण्या नवेते,
असाच काहीसा उरात कालव.

लाजरी साजरी घालमेल उरी
गवसले काही, हरवते जरी
दाटलेले वेड्या मायेचे माहेर
साजण डोळ्यात, वेचतो आसवं.
.
-भूराम
12/21/2012

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१२

** वेडा **

तो एक शब्द अजून सुरतो
भोवती फिरतो, सभोव धरतो.
आनंदाच्या नाद घडीला
प्राण खुणांचे स्पंदन करतो.

जरी कळेना कोणावरती
करे कुरखोडी मौनावरती
फिरून यावा गेलेला क्षण
असा मोहतो, रिंगण धरतो.

सांज धुळीचे काहूर यावे
तेज निळेसे तांबूस व्हावे
वेड्या मिठीचे गाभुळले मन
कसा हेरतो, हळवा करतो.

अंधाराचे व्हावे यौवन
टीमटीम करते यावे चांदण
त्याला कळते ह्याच घडीला
कोण कुणाचा वेडा ठरतो.

-भूराम
११/२२/२०१२

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१२

*** बोललोच नाही ***

"बोलता न आले म्हणूनी बोललो न काही
जगणार्या स्पंदा खातर थांबलो स्वतःही
चांदणे नभाशी येते चंद्र नित्य नाही
ओघळत्या थेंबा खातर भांडली व्यथाही"

पाखरा तू गातो का रे तेच गीत माझे !
फडफडत्या पंखामधले एक पीस ओझे
गरगरते वाऱ्या संगे दूर दूर नेई
बोलता न आले म्हणूनी बोललो न काही.

प्राण खुणांचा हा सारा मोह जाळ होता
विझलेल्या दिवट्यांचा धूर फार होता
दिसले जे बिंब माझे मला निट नाही
बोलता न आले म्हणूनी बोललो न काही.

जे घडते ते घडते, वृथा शोक त्याचा
आकाशी गडगडते का शोध पावसाचा?
वाटे ना कसलेही, कसलेssच नाही.
बोलता न आले म्हणूनी बोललो न काही.

काय कुणा बोलावे मी, बोलणे न आता
गुणगुणता हलकेही डोलतो हा माथा!
कसले हे सत्य आहे, नित्य जे प्रवाही
बोलता न आले म्हणूनी बोललोच नाही

-भूराम
११/१२/२०१२

रविवार, २८ ऑक्टोबर, २०१२

*** शुभ रात्री ***

तू थांब ओंजळ, वाऱ्यावरची,
तू देह अगतिक, ओली धरती
तो चांद ऋतूचा किंकर करतो
अन प्राण तुझा ग येतो भरती.

रात खुणांचे किरकिर तारे
स्पंद ॠणांचे बंधन सारे
सभोव जाते गलधून आणि
मौन झुलावे ओठांवरती . 

स्थिर होवूदे श्वासांमधले
ते भाव अनोखे घुंगुर वदले
नाद दिवाणा असे तो त्याचा
वेचून घे तो तुझ्याचसाठी.  

ते स्वप्न खुणाचे अंथर आता
ते स्पर्श क्षणांचे पांघर आता
दिवा विझून तुझ्या बाजूचा
घे नीज मिठीशी सखे सोबती.

-भूराम (१०/२८/२०१२)

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१२

** का? **

आज माझ्या वेदनेला का कळेना दुःख तिचे!
सावल्यात पेटलेल्या चांदणीशी सख्य तिचे!

रान झाले श्वापदांचे मज कळेना ते कसे ते?
गुंजरावी पाखरांना शांत केले तू कधी ते?

वेदनेच्या स्पर्श राती गोढलेला श्वास येतो.
ते उसासे, ते दिलासे, थांबलेला भास होतो.

सांग साये पाठमोरी तू बिलोरी हासणारी,
आज मुग्ध का असे तू मुक्त शब्दे भेटणारी?

प्राण देही मोह वारा, स्पंदनांचा तो पसारा,
वेदनेच्या ह्या घडीला दूर वाटे का किनारा?

-भूराम
१०/२१/२०१२

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१२

** भोवताली तुझाच हा रव **

ही पाखर बोली माया
क्षिताजीशी येते अलगद.
नयनांच्या काठावरती
होडीचा भिजतो कागद. 

हे सुन्न किनारे होती
स्पंदांचे घुंगुर गाणे.
लाजेचे जांभूळ वेडे
चंद्राचे तुझे उखाणे. 

वाऱ्याच्या झुळकी वरती
पदराची थरथर येते,
पाण्याच्या पटलावरती
मिणमिणते बिल्वर ना ते?

बघ तुझेच वाटे मजला
ताऱ्यांचे हसणे वेडे.
कानाशी कुजबुजणारे
ते हळवे कुंतल वेढे

स्पर्शांशी असेच येती
हे आसू भरले आठव.
तू दूर कुठेही असली
भोवताली तुझाच हा रव.

-भूराम (१०/१४/२०१२)

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१२

**मी**

मी आहे त्या विस्मृतीचा,
क्षण व्यापीत दाह कृतीचा,
का आहे स्पर्श श्रुतीचा,
स्पंदातील नेह गतीचा!
 

उधळून हे मोहातील बंध,
तो प्रत्येक नियतीचा अंध,
मी असतो सांखिक आणि
नसतो त्याच मितीचा.
 

'मी' गौण कुणाशी आहे
आराधी देव सदा हे
'मी' कोसळता त्या अर्थी
होतो स्वाह धृतीचा.
 

'मी' कर्म उद्याशी नाही,
आहे जे सदोनीत वाही ,
का प्रश्ना मधली कुंती
नाकारे पोर नियतीचा?
 

उर्जेचा देहातीत शून्य,

जाणेना 'मी' अहंमन्य.
तिमिराला चिरतो तेजे
जाणता 'मी' सवितेचा.

कारण...


 
'मी' असतो, जसा तो आहे,
'मी' राहील जसा तो आहे
जाणीव असावी फक्त,
''मी' आहे जसा मी आहे.'
 

-भूराम (१०/१३/२०१२)
 

स्वतःला नाकारू नका, आणि स्वतःला स्वीकारू ही नकाच
फक्त जाणा स्वतःला आणि बघा क्षणात अंधकार कसा दूर होतो तो.
-स्वः 'मी' समर्थ
-स्वामी सम अर्थ
-स्वाह 'मी' , स्वाह 'मी', स्वाह 'मी', स्वाह 'मी', स्वः 'मी', स्वामी समर्थ
 

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२

**डोह**



मी माझा मोहीत देह
स्पर्शाचा चांदण स्नेह
विरात्या विश्व सुराशी
चाहूल, तुझा संमोह.

मी कुण्या संचित देशी
वाटे खुळा दरवेशी.
तू संज्ञा माझी होता
दाटून येतसे कोह.

हे स्वप्न सुरांचे गीत
अजून न कळते प्रित
धरतीच्या संयत वेळी
क्षितीजाचा होतो डोह!

-भूराम १०/१०/२०१२

सोमवार, १६ एप्रिल, २०१२

गदगद

माझे गढूळ काळीज,
रात गळते एकाकी.
चांद ओल्या त्या डोळ्यात
कशी जळते लकाकी.

वाट पाउल पाउल
देतो मृदुगंध हुल
नाद करतो पिंपळ
नाही पहावे चकाकी.

साद घालतो किनारा
लाटांसंगे जगे वारा
धडधड ही दिशेला
फ़डफ़ड ती पताकी!

झाली घरामधे धुळं
घे गं आवरून आई
आज आडोशी ढगाला
किती गदगद होई.


-भुराम
१६-०४-२०१२

शुक्रवार, १६ मार्च, २०१२

...भ्रम...

मन बांधलं मानसी चांद तेव्हडा घेवू दे.
रान पेटल्या दिशेला आज सयेच येवु दे.

ॠण कुणाचे सांगणे नाही देवळाची ओढ
पाय ठेवता मातीला आसवांना होते जड
काळजाचा डोह होतो, प्राण कोसळून जातो
थांब कुणाला म्हणू मी, पापणिला ह्या लवू दे.

प्रेम पडले निजेला नाद करते घुंगुर
शोध डोळ्यामधे आता देह माखला शेंदूर.
फ़ुल वाहिलेली कुणी, कुणि केलेला नवस
दान कुणाला मागु मी दान मलाच होवू दे.

इथे गेले दूर गीत, जिणे झालेले शापीत
रोज स्वप्नातील सांग कोण घडवी अवधूत.
देह माझा हा पडू दे, आज मोकळे रडु दे
शब्द भ्रमातिल माझ्या गीत येव्ह्डे गाउ दे.

स्पंद पोखरते माया, धुर पोखरता श्वास
माझ्या परिघात मला किती घडतो प्रवास.
निळ माथ्याची गळू दे, धुळ पायाची ढळू दे
चांद तेव्हडा घेवू दे, चांद तेव्हडा घेवू दे.
रान पेटल्या दिशेला आज सयेच येवु दे.
रान पेटल्या दिशेला आज सयेच येवु दे.

-भूराम १७-०३-२०१२