शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

वेदना स्पंदांची

रत्नांगी, मनसुधा, वेदना स्पंदांची
अर्धांगी, संस्कृती, मोहत्या गंधांची.

आकाशी 'कोहतो', पाहतो भवती मी
रातीचा देह तो, काजळी द्रवतो मी.

मोकळे श्वास हे वेचती अवनीला
चांद ही बिल्वरी, होतसे किलकिला .

गारवा पदरीचा उब मागे जशी
सोहळा पाहुनी पापणी जागे तशी .

नाद वेडा कसा जान्हवी वेग हा  
लाजरा साजरा लाघवी मेघ हा .

होवू दे साजरे जीवनाचे ऋतू 
आज ह्या वैखरी शब्द झालीस तू.  

-भूराम
१०/१९/२०१३

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

** मदारी **


घन बांधतो उद्याशी आकाश संभ्रमाचे
जगण्यातल्या धुळीचे आकांत मोह माझे.

अंधार श्वापदांचा हा भोवतीस आहे
स्पर्शातल्या रतींचा तो रोज भास आहे.

रक्तात कोसळावे गंधाळती इशारे
ऋण बांधता क्षणांशी आवेशती निखारे. 

पाऊस पावलांना, सृष्टीतल्या चरांना
अवनीस कडाड तो अन तेज अंकुरांना

मी पाहतो वयाचे हे नित्य नृत्य आहे
कधी वाहतो, कधी मी, पेटतोच आहे!

हे संभ्रमी नसे का? तू सांग यौवनारे
त्या चांदण्याच आहे कि दुःख स्पंदनारे?  

स्पन्दाताल्या युगाशी हो व्यक्त तू आता रे !
विस्तारता घडीला मी मुक्त तू आता रे!

जाणुन आज घे तू, ह्या भावना दुधारी
अन दे छेद त्या रूढींना होय तूच तो मदारी.

-भूराम
(१०/१३/२०१३)