रविवार, २ ऑगस्ट, २००९

देना प्रियकर साद


(सकाळची वर्दळ नसलेली वेळ, बागेत मोर्निग वाक घेतांना फ़ुल वेचणारी सुंदर ललना दिसते आणि ही कविता जन्मते)

तुझ्या प्रितीची अबोल मजला देना प्रियकर साद.
उमलत्या क्षितीजाला देना तव नयनातील माद.

तो वारा, खोडकर येतो, छेडून, हळूच तुझ्या केसांना
मारून गिरकी, मजभोवती, म्हणे, ’पहा कळी खुलतांना’
असाच तरळत जातो त्यासव, कसा घालू गं वाद?

ती लहरे ओढणी, कशी अवखळ, तुझी सखी जिवलग,
टोचून कोपर, चुकवून नजर, म्हणे, ’तो आलाय बघ’.
उगाच आवरून घेते तिजला, करीत चुड्यांचा नाद!

ती पहा बघीची कळी, पालवी, कशी खेळती आज,
ते धुंद बिलगणे, कानी बोलणे, नसे तयांना लाज.
कशास भीते, मी तर मागे, तो नयनी संवाद.

परडी हाती, पहा फ़ुले ती, आत्ताच तू वेचली,
झुकवोनी नजरा मुग्ध उभी का? म्हणून तुजवर रुसली.
कसा कळेना अजून तुजला त्यांचा तो हळवाद.

एकांत असा हा पळपळे, जाईल लगेच गं हरवून,
शांत रस्ता, पहा कसा तो, जाईल मग गजबजून!
कशास झुरणे, नंतर दोघे कर आत्ताच हा प्रमाद!

तुझ्या प्रितीची अबोल मजला देना प्रियकर साद.
उमलत्या क्षितीजाला देना तव नयनातील माद.

-भूराम (२६/१२/२००१)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा