रविवार, १० जानेवारी, २०१०

उलटली रात्र अवघी ही!

उलटली रात्र अवघी ही
उमटल्या नयनांत सावल्यांची.
बदलत्या वार्यात हरवत्या त्या,
निळ्याश्या चांद्र पावलांची.

कुशीत मुग्ध, चंदणी ती,
बटांशी छेड, लावणी ती,
खुलावी गंध श्वासातून
मिठीशी ओल साजणी ती.
रोमांचे, स्निग्ध धुक्याला
बिलगत्या वेदनांची.

उधळती स्पंद अधरात
उजळती कोरली कात,
दवाच्या थेंब, गजर्यातील
प्रकाशी, बिंबली, स्नात.
कळीच्या बंद पटलातील
उमलत्या भावनांची.

उलटली रात्र अवघी बघ
उमटते जाणिवांचे जग
जगाशी बांधल्या क्षितिजा
उगवती वेंधळीशी धग.
धगीच्या धुंद कोमल त्या
फ़ुलांची, पाकळ्यांची.

धुळीच्या चांदण्यातील मी,
विखुरल्या पैंजणातील मी,
नभाशी कान, किलबिलत्या
सुरांच्या जागण्यातील मी,
अजुनही गुंफ़ माळेत,
तुझ्या त्या आर्त कवनांची.

अजुनही गुंफ़ माळेत,
तुझ्या त्या आर्त कवनांची....

-भुराम.०१/१०/२०१०