(९)
लहरींचे धुंद मन,
स्पंद स्पंद आकुंचन,
कुंचल्यात जपलेले,
रंग एक, थेंब दोन.
फ़टकारे देत असे,
ओतप्रोत दिव्य ठसे,
मन माझे रंगलेरे
स्पंद स्पंद बिंबवून.
-भूराम (०१/०८/२०११)
(१०)
उधळिले असे मला
चांदण्यात मुक्त मी,
वाटले अता तरी
चांदणी दिसेल मी.
चंद्र हा तिथेच गं,
पाहुनी हसे कसा,
"व्यर्थ हा प्रयत्न गं
विखरूनी जासी तमी"
-भूराम
(१/१५/२०११)
(११)
वेड ह्या जगातले,
जगण्यातले असेच गं
गेले ते कळेच ना,
कधी कुठे कसेच गं?
कळता जरी तुला,
मोह नाही आवरे
तू खरे जाणेच ना!,
सत्य ही तसेच गं"
-भूराम...
(१/१५/२०११)
(१२)
घनतारी निळा तम गातो
क्षितिजी सुधास्रव न्हातो
परिघाशी स्पंद खुणांचा
तो तारा उद्यास्तव येतो
मी पुसतो माझी काया
ही ओल नसे ही माया
स्निग्ध होत्या जाणिवांनी
मी ’मार्गस्थ उषेचा’ होतो.
-भुराम (८/१०/२०११)
(१३)
चांद नभी जळतो गं
स्पंदनात चुरगळतो
वेदनेशी हळुवार
शांत-स्मित विरघळतो.
ह्या इथे अन त्या तिथे
गंध गंध आदळता
कर्षणे अभा निळी
धुंद कुंद वादळतो.
-भूराम
(१४)
ही वेदना नभाची
तू जाण रे मनुजा
परीघात दाटलेला
हा प्राण रे मनुजा
नसेच अंत माझा
एक हीच खंत
न लाभणे क्षितीज
तू धाव रे मनुजा?
-भूराम
(१५)
तू खुळी सजणी गं
गेली कशी भाळूनी
धाव धाव ह्र्दयाची
चंद्र खुणा माळूनी
बघ तीथे एकांती
घनगाळी मोहनिळा
न त्याचा, न असे तुझा
संमोही तो नादखुळा.
-भूराम
(१६)
किती गोड सजणी तु
यक्ष गीत गाते सदा
वाद! नभी रुणझुणता
तंत मोह हो दिडदा
घनकाया मदनारी
परिघांशी वदणारी
साहवेना, छळते गं
हाय नभी मी कलता.
-भूराम (१४/१०/२०११)
(१७)
विलगतसे चंद्र नभी
परिघाशी कुंद छबी
आद, वाद, साद, दाद
मदनाची हीच खुबी
रात रती सळसळती
हाय मिठी विरघळती
वेदनेशी लयकारी
नादखुळे निर्मळती.
-भूराम (१४/१०/२०११)
(१८)
घन तोही घनकारी
आत्मरंगे जरतारी
भिजलेल्या कवनांची
नाद उठे लयकारी
सानंदे मोद खिरे
वलयी तो शोध फ़िरे
प्राण कुणा गवसेरे
कोण होई भर्तारी!
-भूराम (१९/१०/२०११)
(१९)
प्राणांची प्रणयकला
धुंद नित मनविकला
श्वास करी स्पर्श जसा
रोम रोम परिघ मला
निज लागे रात नवी
चंद्र तोच, चांद छवी
स्फ़ुटलेल्या वचनांची
मनमंथरी शांग्रिला.
-भूराम(२२/१०/२०११)
(२०)
अंबोदी निखल मन
घनकारी विदुल क्षण
परिघाच्या गर्तेतून
आर्त उठे संकिर्तन
विलसी तो मोद जरी
मितभाषी बोध करी
ॠणमाये तू मनुजा
गर्द करी मनमंथन
-भूराम(२२/१०/२०११)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा