शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

--आसमंत--

प्राण,
पोखले  पोखले
नाद नदीच्या किनारी
सांज धुळीची निखारी
उजवले आसमंत. 
मन,
झरता झरता
चांद अलवार झाला
ओघ नसता कशाला
रुजवले आसमंत
क्षण,
नादले नादले
रात गाभुळत्या वेळा 
चांद अबिरीं खुलला
सजवले आसमंत.
तन,
उरले नुरले 
नाही जाणीव कशाची
ओढ चांदणी स्मरांची
भिजवले आसमंत
ऋण,
कळते छळते
गेल्या काळाचे ते होते
तुझ्या मिठीतले नाते
निजवले आसमंत

-भुराम
२/३/२०१८

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

चित्रांची रुणझुण

निच्चल मन
निर्मल निल धन
ओघ समेतून
कुंचलती क्षण
थेंब टिपकारी
दुडत्या फटकारी
व्योम चितारी,
छेडी जीव धून.

भाव गर्भतो
रंगारी होतो
यांत मिसळतो
त्यात विखुरतो.
ओतप्रोत मग
रंगांकीत माया
कुठे निखळते
होवूनी उन्मन.

घनाकारी त्या
स्पर्श नभातून
यावी जलदा
दिव्य तमातून
त्यात तरलत्या
वलयांकीत गुंता
कुणी सांडली
चित्रांची रुणझुण.


#भूराम

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

श्रीमंतसन्निधीं श्रीमंत हो तू
आकाशी अनंत हो तू
पळता घडीभर थोडी
घडतां उसंत हो तू .

हो व्यक्त स्पंद नादी
आश्वस्थ हो समाधी
जन्मास बांधलेल्या
परिघी दिगंत हो तू.

निरता निरंजनाची
हो तेवती तू ज्योती
पडत्या फुलास झेले
ऋतुमानी वसंत हो तू .

आत्म्यास बोध आहे
श्वासास शोध आहे
भवतात विखुरणारा
क्षण एक निरन्त हो तू.

#भूराम