शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

।। वदंता ।।अनौघे मनाचा परिणीत गुंता
निशब्दे निमावा अमुक पंथा
निळे शांत झाले निखारी निमंत
जसा ओघ आहे तसा मी श्रीमंता

जणू भास होती सभोवी समर्थ
अणू खास होती न काहीच व्यर्थ
असे शून्य झाले उकारी निरंत
जणू ते प्रवाही दिकांशी अनंता.

कळी शांत काया फुलावी कधीशी
जरी मोह माया कळावी कधीशी
किती जन्म झाले पसारी दिगंत
कसा राहिलो मी भिकारी करंटा

असावे सुंरांचे काळीज गर्भ
कळाले कधीना झोळीत दर्भ
कुणा भाकवावे, कधी व्हावे श्रांत
सदा भांवनांचा हा फिरतो वरंटा.

कधी वल्गनांचा न झाला तो त्रास
किती वेदनांचा मी केला प्रवास
जरी क्षोभ होते ना होती ती खंत
कळालो कुणाना नी झालो वदंता

-भूराम
१०/१४/२०१७

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

पुर्णत्वा


तू अवघा निर्मित स्वप्नांचा एक सुंदर कोश
भोवती या विखुरलेला तू यत्नांकीत दोष।
जाणिवांचे विश्वच खळते दीर्घ स्पंदन होता
भाव विभोरी श्वास निखळतो संयत होतो तोष।


कोण असे मी जन्मातीत?
माझे सारे अन्, सारे मीच।
आज उद्या अन्, अतीत मीच।
ज्ञान मी अन् ज्ञाता मीच।
दान मी अन्, दाता मीच।
निर्माण मी अन्, निर्माता मीच।


अंधारासी तेजस चिरता लख्खं खुलली काया
नयना काठा थेंब उबेचा चिंब भिजली माया।
विरून जाते जीही होती ओळख मजला माझी
व्यापून गेलो पुर्णत्वाने नुरे ना कसला शोष।


-भूराम

"ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। 
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥"

सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

। कोलाज ।

अंगार चांदव्याचा
स्पर्श जाळीतो काज
ओठात तापलेले
स्फुलिंग चावती लाज

नयनात थेंबलेली
ती काजव्यांची रास
ढळता ढळून जाते
पदरा कलेचा भास 

हे  मोह मोहरावे
स्वप्नात गुंतलेले
सलज्ज चांदणीच्या
स्पंदात स्पंदलेले

घेता टिपून सारे
लकबीतले कोलाज
त्या स्निग्ध श्रावणेला
मग छेडतो खमाज.

-भूराम
१०/२/२०१७

सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

(5) आठ-ओळ्या..contd...(२७)
पाखरा घन निळे
पारधे क्षण मिळे
चांदणी ओघळ होता
शैशवी प्राण खुळे
अनघे मन्म सविता
विलगे देह कविता
स्पंदांची ओंजळ होते
अर्घ्य हे दान कळे.
---------
- भूराम


(२८)
भाव विभोर स्पर्शांची
स्पंद दोन हर्षाची
नाद खुळ्या लहरीं ह्या
व्यक्त गौणाकर्षाची
थरथरत्या पदरावर
स्पंदातीत अधरावर
रोज नवे भाव रुजे
चंद्रांकी विमर्षाची.
---------
- भूराम


(२९)
परीघाची भाषा ही
बंदिस्त अन आशाही
उगमाशी अंत असे
धावणारे वेडे ससे
आरोही अवरोही
ओझ्यांचे क्षण भोई
जिवनाच्या जात्यावर
दळणेच प्रारब्ध असे.

---------
- भूराम


(३०)
स्वप्नफुले जरतारी
मोह खुळे वल्हारी
मायेच्या परिघाशी
नाते नवे रंगारी.
तिमीराशी घन झरतो
अधरी घुंगर भरतो
सृजनाच्या लहरींनी
नाद उठे मल्हारी.
---------
- भूराम

(३१)
आनंदी मोद खिरे
स्वप्न रोज शोध परे
घन देहा तिमिराशी
शांत रुप देत खरे
अनुमोदन शिशिराचे
सळसळते घर माझे
पानगळी जिवनाच्या
उगमावे प्राणझरे.
----
भूराम

(३२)
जगणारा कोण मी?
जीवनातीत गौण मी
आहुतिस समिधेच्या
बघणारा द्रोण मी !
यज्ञाअंकित अनल जरी
संतत ह्या तूप सरी
जळणारा जाळणारा
हव्य मीच शोण मी.
---
भूराम
(1) आठ-ओळ्या
(2) आठ-ओळ्या..contd...
(3) आठ-ओळ्या..contd...
(4) आठ-ओळ्या..contd...

गुरुवार, २० जुलै, २०१७

डीपी (DP)

तुझा  डीपी लय भारी
त्यात नजर करारी
गाला खळी किती गोड
दिसे मदनाची नारी.

रूप खोवलेला चांद
टंच तनू तमी बांध
ओठ गच्च कोरलेली
रोझो रुबिना फेरारी.

काना लगड्ले मोती
बोट बटांशी खेळती
धार नाकाची अशीकी
हिरकणी झक मारी .

तुझ्या नाकात नथनी
उगा त्यात पाचू मणी
हासू किरणोसर्गी ऐसे  
वाटे क्वसार भिकारी.

-भुराम
(7/20/2017)
डीपी (DP) - social media profile picture
रोझो रुबिना फेरारी. - Ferrari car's color Rosso Rubino Metalizado
क्वसार (Quasars) - a massive and extremely remote celestial object, emitting exceptionally large amounts of energy, and typically having a star like image in a telescope

शनिवार, १७ जून, २०१७

मी एक माणूस

बांधलेला स्वर्ग , कोरलेला नर्क
त्या मध्ये जेही आहे ते
ओरबाळून जगणारा
मी एक माणूस !
वर तो पाऊस सांडणारा
खाली तो खळाळून भांडणारा
त्यात स्वतःस सदा विसळणारा
मी एक माणूस!
घडतात चुका माझ्याकडून
कळतात चुका कधी मला बघून
धावणाऱ्या जीवन सरितेत
सदा नवे नाव घेऊन जन्मणारा
विसरभोळा
मी एक माणूस
-भुराम

रविवार, ४ जून, २०१७

टिपतो इशारा...गोठ्विला वारा,
गुंजविला सारा
निळ्याश्या नभाने आज
मांडिला पसारा.
अलवार होता,
काजचा तो ठोका
हळूच झेलता थेंब
चमचम तारा.
ओली धानी काया
गंध मॄदुमृदू माया.
स्पर्श सभोवाचा होता
नाचतो शहारा
पल्लविचा नाद
मनी सुखाचा संवाद
आज येणे सखे तुला
टिपतो इशारा...

-भुराम
June 4, 2011

शनिवार, ३ जून, २०१७

तू सखे कविता

घन  तृष्णेच्या स्पंद तिरावर
चंद्र वैभवी जाणून घे तू
अवकाशातून जाणीव झरता
नयन आर्जवी ओघळ हो तू

शोध नको तो उगा जान्हवी
अव्यक्ताच्या तिमिर सलातून
वेग तसा मी किती रोखतो
अनावर होतो गहिवर आतून
रोध जरी मग तुझा लाघवी
मिठीत येता अवखळ हो तू .

ओंजळ माझी निळी सांडली
भवतालीच्या रेखीव काठी
तृप्त मनाच्या मिलन कळीला
स्पंद गुलाबी बिल्वर गाठी
किणकिणता ती मंजुळ सरिता
सहज क्षणांची खळखळ हो तू

देवदार तो उभा देखणा
झुळके सरशी नृत्य शहारी
पर्वत रांगी घोघावणारा
वारा हर्षी मुक्त विहारी
लेवुनी त्यांच्या मुक्त छवीला
नाद पेरती सळसळ हो तू

तप्त द्रुमीची ऊन सावली
जडभारत जो जगे पावली
शून्यात रोखल्या नजरे आतून
सूक्तांची मग उधळण झाली
कुणा कळावी किती वळावी
अशी एकदा अवघड हो तू .

व्योम व्योम ते कापूर जाळी
रक्त खुणांच्या संचित भाळी
तिथे पाखरे मुक्त थव्यासवे
रोज रेखती भव्य सकाळी
कळतील जरी ही कुणा इशारे
 तू सखे कविता निर्मळ हो तू .

-भुराम  

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

(4) आठ-ओळ्या..contd...

(२३)
परिघी व्यक्त नदीने
लयनादी उधळीत जावे
ओठांच्या कोंदण काठी
शब्दांनी मंजुळ व्हावे
त्या दिक्प्रभेच्या वेळी
राव्यांचा फिटता गाभा
त्या प्राजक्ती स्मरणांचे
चांदणे विखरुनी द्यावे.
-भूराम
***

(२४)
मन स्पंदारवी गंध रुचा
त्या आवेशातील बोध तुझा
संक्ऱषातील गर्द त्वचेचा
योग समर्पित स्पर्श तुझा
हळवे देऊळ , वेडे वाडे
जिर्ण कुठेसे घुंघुरणारे
अज्ञातातील मंद रतीला
शोध तुझा हा गे शोध तुझा.
-भूराम
***

(२५)
पळसामागे पळस डोले
ओढनामिक चांदण झेले
डोळाभारी अधर वेदना
थेंब थेंब मग रोध तुझा.
दूर विणेची शुन्य गर्जना
ओले काळीज करी अर्चना
अश्वत्थाच्या सळसळ नादी
घडे मला अनुमोद तुझा.
-भूराम
***

(२६)
बांधील तुझ्या पाऊल खुणा
ओघळणाऱ्या चांदण ऋणा
सावलीत कुठे कोरलेल्या
कुठे पेरल्या संपृक्त मना.
सावध सावज साधच सांगत
धावत धावत क्वचित रांगत
काळ सरतो त्वचा बदलते
हासू तेच दे कोवळ्या उन्हा.
-भूराम
***
(1) आठ-ओळ्या
(2) आठ-ओळ्या..contd...
(3) आठ-ओळ्या..contd...

बरं वाटलं

तू ओघा ओघानेच आलीस
मनात,
चंद्र देखण्या गुंजारवी मौनात.
*
*
सावल्या नकळत रुजू लागलया
मातीत,
नखाने कोरलेल्या तुझ्याच सावलीत.
*
*
पावसाचंहि पावसात बरच असतं
कोसळणं,
जसं तुझं नकळत माझ्यात ओघळणं!
*
*
चिंब भिजू नकोस हैराण होशील
शिंकांनी!
का हरकलीस खोल उठलेल्या तरंगांनी?
*
*
गुंतली होतीस ना तू खरंच सांग
माझ्यात?
दूर होतांना दिसलं होत सारं तुझ्या डोळ्यांत.
*
*
वेडे उगाच मांडत बसलीयस हे गणितं
शुन्यांचे !
हिशोब लागलेय का कधी त्या निघून गेलेल्या क्षणांचे?  
*
*
ओझरती का असेना बऱ्याच क्षणांची आज भेट
घडली,
चंद्रानेही नक्कीच आज ढगा आड असेल त्याची पाठ थोपटली.
*
*
हो नक्कीच!
भेटलीस बोललीस बरं वाटलं.

-भुराम
4/5/2017