रविवार, १८ मार्च, २०१८

जागर

मागे काळोख बांधला
पुढे उजेड सांडला
घेतो प्रवासाची शिधा
जोही आशिष चांगला.
कुठे भागते तहान
कुठे वाटते लहान
भले बुरया अनुभवा 
नित गोडवा मानला
आसवांचे मोती केले
ओठा हासू देत ओले
जिणे जगत्या राहाटी
भाता श्वासांचा चालला
रोज सूर्य उगवितो
रोज चंद्र तो कलतो
मावळता काळजाशी
हाच जागर मांडला. 

-भुराम , 3/18/2018 Pune 

रविवार, ४ मार्च, २०१८

गुपित

माझ्या घरातले ऊन
तुझ्या दारी मी सांडिले 
ओले गाभूळ काळीज
तुझ्या पदरी  मांडिले

ओल मायेचे गं तुला
थोडे कोरले मातीला
अलगद त्या उबेत
माझे गुपित पेरले

गेले दोन चार दिस
आले आभाळ भरीस
थेंबा थेंबाने सरींना
तुझ्या मिठीत शिंपले.

उमगले ते तुलाही
दडविले तुही नाही
अंकुरलया श्वास देहा
सुखे जीवन तू दिले.

कसा परिसला साथ
भरविला दूध भात
जीव जीवाचा जीवात
दुडू दुडू ते धावले

गेले दिस गेली रात 
रूप तुझे माझी कात
आले पाखराला पंख
दूर देशी ते पांगले.

झालं मोकळं देऊळं
किणकिण ना मंजुळ
तूझ्या हाती माझा हात
दिस मोजत चालले   
आता... 
डोळं लागलेले दारी
ओढ गोठलेली वारी
दूर देशी गेले मन
पुन्हा कधी ना बोलले

-भूराम
४-मार्च-२०१८