सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

बिलोरा


बांधली निळाई
सांजला किनारा
पल्याड गहीरा
चांद पाठमोरा


तरुची धिटाई
आली सटवाई
बाळ गं झोपला
सांग अता होरा.

दुडते पहाट
झुलते वहाट
नदीचा कलाट
जोजवीतो वारा

सांडीले प्राजक्त
तुझे माझे प्राक्त
वेचला दिवस
हासरा बिलोरा

-भूराम

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

।। वदंता ।।



अनौघे मनाचा परिणीत गुंता
निशब्दे निमावा अमुक पंथा
निळे शांत झाले निखारी निमंत
जसा ओघ आहे तसा मी श्रीमंता

जणू भास होती सभोवी समर्थ
अणू खास होती न काहीच व्यर्थ
असे शून्य झाले उकारी निरंत
जणू ते प्रवाही दिकांशी अनंता.

कळी शांत काया फुलावी कधीशी
जरी मोह माया कळावी कधीशी
किती जन्म झाले पसारी दिगंत
कसा राहिलो मी भिकारी करंटा

असावे सुंरांचे काळीज गर्भ
कळाले कधीना झोळीत दर्भ
कुणा भाकवावे, कधी व्हावे श्रांत
सदा भांवनांचा हा फिरतो वरंटा.

कधी वल्गनांचा न झाला तो त्रास
किती वेदनांचा मी केला प्रवास
जरी क्षोभ होते ना होती ती खंत
कळालो कुणाना नी झालो वदंता

-भूराम
१०/१४/२०१७

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

पुर्णत्वा


तू अवघा निर्मित स्वप्नांचा एक सुंदर कोश
भोवती या विखुरलेला तू यत्नांकीत दोष।
जाणिवांचे विश्वच खळते दीर्घ स्पंदन होता
भाव विभोरी श्वास निखळतो संयत होतो तोष।


कोण असे मी जन्मातीत?
माझे सारे अन्, सारे मीच।
आज उद्या अन्, अतीत मीच।
ज्ञान मी अन् ज्ञाता मीच।
दान मी अन्, दाता मीच।
निर्माण मी अन्, निर्माता मीच।


अंधारासी तेजस चिरता लख्खं खुलली काया
नयना काठा थेंब उबेचा चिंब भिजली माया।
विरून जाते जीही होती ओळख मजला माझी
व्यापून गेलो पुर्णत्वाने नुरे ना कसला शोष।


-भूराम

"ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। 
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥"

सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

। कोलाज ।

अंगार चांदव्याचा
स्पर्श जाळीतो काज
ओठात तापलेले
स्फुलिंग चावती लाज

नयनात थेंबलेली
ती काजव्यांची रास
ढळता ढळून जाते
पदरा कलेचा भास 

हे  मोह मोहरावे
स्वप्नात गुंतलेले
सलज्ज चांदणीच्या
स्पंदात स्पंदलेले

घेता टिपून सारे
लकबीतले कोलाज
त्या स्निग्ध श्रावणेला
मग छेडतो खमाज.

-भूराम
१०/२/२०१७