बुधवार, १० सप्टेंबर, २००८

...रास...

पियुषाचा पाऊस सभोती
धुंद धुंद ती नाचे रती
पाठीवरती केस मोकळे
स्तनात ऋतूरस पाझरती.

नयनात लवलव चंचलता
ओष्ठात द्रवली स्फ़ुलिंगता
लाजलाजरी, साज साजरी
नटली वेलून पूष्पलता.

पैंजणाची झुणझुण झुणझुण
कर्ण कुंडले मिणमिण मिणमिण
कुणी न आता येथे सभोवती
कुणास शोधे अधून मधून

आला द्रुत तो पवन मदन
झाली उन्मन शहारले तन
धुंद स्पंदने ते आलिंगन
पाहण्या लवले तरू नी गगन

वर्णू कसा मी बंध तयांचा
स्पंदू कसा मी स्पंद तयांचा
अपूरे माझे शब्द सांगण्या
आवेग कसा त्या दो उरांचा

रास रंगला असाच किती...
मी थांबलो तेथेच कीती!
येवून सांज कवेत माझ्या
चल घरला म्हणे सोबती.

--भूराम
२२/१२/२००१