शनिवार, २६ मार्च, २०१६

वेदना

असंथातुनी संथतो स्पंद एक ,
अबोधातुनी बोधतो स्पंद नेक
जरा वेगळी सांज येता सलांची,
झरे निर्मिती वेदनांची सुरेख.

अभोगातुनी भोगता श्वास गुंता
निळा मैथुनी धावता एक पंथा
मिळे हे किती अनादी अतर्क्य
घडे पेरणी भाव-नादी सुरेख .

असावे असे भय आठवांचे किती
उसासे जसे खळखळावी नदी
नसे शुन्य ते शुन्य झाले कधीचे
उरे संपुटी आसवांची सुरेख.

किती गुंतलो वेदनेच्या निखारी,
मिळाले किती मी सलांचा भिकारी
जळालो किती जळतांना उराशी
अशी वेदना वेदनांची सुरेख!

 -भूराम (३/२६/२०१६)