गुरुवार, ३१ जुलै, २००८

तू मनीष

मनीष माझा एक बालपणीचा मित्र. त्याचा स्वभाव आणि माझा अनुभव ह्या कवितेत मांड्ण्याचा पुरेपुर प्रयत्न केलाय. मनीष यार मित्रा तूच वाच आणि सांग किती जमले ते...

तू मनीष ,व्यक्त वेश,
चांदणी तुझा तो देश,
चाहुली असंख्य आहे
यत्न सारे नसे तो क्लेष,

पाउले तुझ्या दमाने ,
शोधणारे चांदणे,
रोज चंद्र तुझ्या कृपेने
उगवणे लोपणे.

राहतो तू पाहतो तू
हासणे, ते खेळणे.
प्रेम हे रक्त तुझे
नसानसात वाहणे.

तू धुरा, सबल करा.
जाण ती तुझ्या उरा.
कष्टला तो भूतकाळ,
आज तो सूर्य धरा.

जिंकणे तू जिंकणे
हेच रे आता मनीष,
तू मनीष व्यक्त वेश,
चांदणी तुझा तो देश.

--भूराम.

गुरुवार, २४ जुलै, २००८

भोकरडोळे (एक बडबड कविता)




भोकरडोळे भोकरडोळे पाहतात काय
वाटीत ठेवलेली दूधाची साय...
भोकरडोळे गेले वाटीपाशी
चाटून गेली वाघाची मावशी.

भोकरडोळे भोकरडोळे चाललात कुठं?
पाठीला दफ्तर आणि पायात बूटं.
भोकरडोळे बसले पूटकन छान!
काढलं पुस्तक आणि घातली मान.

भरभर भोकरडोळे अभ्यास करी
सुटली शाळा आणि पळाले घरी.
फेकल दफ्तर, धुतले हातपाय
भोकरडोळ्यांचा आता program काय?

भोकरडोळ्यांचा Program:

भोकरडोळे आले
पाटावर बसले
वरण-भात पाहून
खुदकन हसले
लोणच्याची फोड़
झाली गुडुप
"आई द ... थोलं
वाल अदून तूप!"


--भूराम

बुधवार, २३ जुलै, २००८

मीच खरा अपराधी (एक विडंबन काव्य/ मुक्तगीत)

मुळ गीत:
"भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी
विठ्ठला मीच खरा अपराधी "
गायक: अजित कडकडे.

सम्पूर्ण काल्पनिक ... कुण्या भक्ति विलीन ह्रदयास हे विडंबन काव्य/ मुक्तगीत न रुचाल्यास क्षमा करावी.

भक्ति वाचून मुक्तेच्या मी लागलो रे नादी,
मितरा मीच खरा अपराधी ||ध्रु||

शारुखाचे 'कुछ कुछ' अनुभवं,
सल्लुदाचे काही आसवं,
picture पाहूनी सरले शैशव,
जडली काय व्याधी ...१

मितरा मीच खरा अपराधी ||ध्रु||

झाडामागे म्हटली गाणी,
घनमन फिरलो बैलावाणी,
खुप उधळिला मुक्ते मी money
उरला नाही निधी ...२

मितरा मीच खरा अपराधी ||ध्रु||

गेली मुक्ता ,झाले लगीन,
उरले मागे कुत्रे जीवन,
पुढे न रमले कोठेही मन,
तिच्या चिन्तने कधी ...३

मितरा मीच खरा अपराधी ||ध्रु||

भक्ति वाचून मुक्तेच्या मी लागलो रे नादी,
मितरा मीच खरा अपराधी ||ध्रु||

--भूराम


सोमवार, २१ जुलै, २००८

गाथा

ग्रेसच्या कवितांना स्मरून ...

अर्थ निळे गहिरेही
मन माझे बहिरेही

चालतात शब्द जणू
विश्वाची कामधेनु

पावलात भास खुळे
काळजात श्वास जळे

देहताही सुन्न काही
जगण्यात यत्न नाही

त्या खुल्या स्वप्नांची
बोलणारया प्रश्नांची

मांडलेली ही गाथा
ठणके मी ही आता.

-भूराम

गुरुवार, १७ जुलै, २००८

वैभवी राजा


शब्द अजूनी स्मरतो हृदयास छेद देणारा.
अनेक आकातांचा भयनाद वेद होणारा.

शब्द अजूनी स्मरतो आकाश निळे जळणारे.
क्षितिजात तांबड्या ओळी, आणि सूर्य बुडणारे.

शब्द अजूनी स्मरतो धमन्यात रक्त उड़णारे,
मिळत्या सावली खाली आयुष्य स्वस्त होणारे.

शब्द अजूनी स्मरतो स्मरणार मला का नाही!
ओंठास तिच्या त्या चिरा दिसणार मला का नाही!

शब्द अजूनी स्मरतो जातांना पडलेले ऊन,
दोन पाउलानंतर चालली पुन्हा ती थांबून.

शब्द अजूनी स्मरतो संथ श्वास तो माझा,
राणी ज्याची ना कुणी, असा मी वैभवी राजा.

असा मी वैभवी राजा....

--भूराम

रविवार, १३ जुलै, २००८

स्वप्नाची वरात


काढू पाण्याच्या वाटेला
एका स्वप्नाची वरात.
जसा लागेल उतार
तसं जावूया वेगात.

आले रंग वेडे गावं,
करू संथ थोड़ी धावं.
थोडं घोटाळून तेथे ,
उमटवू रंगे नावं.

थोडं साचू खळग्यातं,
वेचू निळे ते आकाश.
कोण्या मासळीला घेउ
नवा मांडूया तो रास.

होता पावसाची भेट,
मग नाचावू बाहुली.
करू जल्लोष हर्षाचा,
द्वाड पोराच्या पावूली.

हीच स्वप्नाची वरात,
नेऊ सागरा पर्यंत
होवू विलये विशाल
समेटूया दुःख खंत.

--भूराम.

धुवून गेला


क्षणाचा मोह ,
आणि क्षणाचे प्रेम
बदामाच्या आकारात खोचलेलं
नेहमीचच, आपल तेच same!

दगड, भिंती, झाड़,...
"एक दूजे के लिए",
"क़यामत से क़यामत तक", म्हणत म्हणत
वाजवत जातात सगळ्यांचाच game!

आम्ही रसिक मात्र
वाचतो खर ...
तोंडात पान -गुटका असेलतर
करतो सुध्धा acclaim!

अशाच एका दगडा जवळ आलो
आणि हळहळून म्हणालो
"प्रेम कुणाच आणि बळी कुणाचा,
What a shame?"

तेव्हड्यात एक कुत्रा आला
केली टांग वर आणि
धुवून गेला
त्याच name, ...
तीच name,...
आणि थुंकणारयाचाही claim!


हां हां हां ...
--भूराम

शनिवार, १२ जुलै, २००८

आभाळग्रस्त


मी एक आभाळग्रस्त,
क्षणाक्षणात दाटून येतात ढग,
हलक्याच झुळूकीने सुरू होतो पावसाळा.
नदी, नाले आधीच तुडूंब भरलेले,
फ़क्त दिसतो
थेंब ...
थेंब ...
कोसळणारा.
मी एक आभाळग्रस्त,...

कधी मी विज कडाडतो,
कधी मी ढग गडाडतो,
कधी हसतो हलकेच,...
ढगांचा एक कोपरा उघडून!
कधी आताच रडतो...
चेहरयावर प्रकाश घेउन...
प्रकाश...
जो पाझरलेला असतो
भेगा-भेगातून...
उराच्या...!
...
...
मी एक आभाळग्रस्त...

--भूराम

प्रिय मित्रांस...


(दीपक आंधळे ह्या मित्रासाठी ही कविता त्याच्या slam-book मधे मी लिहली होती. )

यश भरील झोळीत तुझ्या आकाश चांदणे,
सदा जिवंत हे राहो तुझे सतेज हासणे.
मी भेटेल रे जेव्हा माझी वळवून वाट,
पाहील समर्थपणाने तुझे पुढे रे चालणे.

तुझे आकाशाचे ध्येय, तुझे गरुडाचे पंख,
दिशा दिशांना भेदेल तुझ्या विजयाचे शंख.
हर्षो-शंख नादे नच मला तू भूलणे...
सदा जिवंत हे राहो तुझे सतेज हासणे.

तुला जेही दुःख आहे,ठेव मनाच्या कुपीत.
सारं असह्य जर होता, शोध मला तू सादीत.
मग वेड्या ह्या मित्राला तुझ्या सोबतच येणे.
सदा जिवंत हे राहो तुझे सतेज हासणे.

--भूराम

गुरुवार, १० जुलै, २००८

हे वृक्ष कोणते?



माझ्या हॉस्टल च्या प्रांगणात एक झाड़ होतं.
त्याला गुलाबी इवल्या-इवल्या फुलांचा भर्गच्च बहर यायचा.
हां बहर आला की त्याची सारी पान गळून जायची .
त्याच झाडावर सुचलेली ही कविता.
त्या झाडाच नाव मला अजूनही माहित नाही.
तुम्हाला कोणाला नाव ठावूक असेल तर मला जरूर कळवा.
=======================


मज ना कळे हे वृक्ष कोणते?
गुलाभ्री अंगभर, निष्पर्ण नेणते.
वसंत नाही दूर, वर्खले आभाळ,
मंद हालचाली माझ्याशी बोलते.
स्वच्छ तो प्रकाश, लख्खले खुलास,
क्लिष्ट त्या डहाळी गुलाल झेलते.
मंद स्पंद माझे, छंद श्वास ताजा,
आनंद-खंत मूर्ती... रूप भासते.
मज ना कळे हे वृक्ष कोणते?...

-भूराम

मंगळवार, ८ जुलै, २००८

एक मी आणि ती नदी,... किनारा,

ही कविता माझ्या मनाच्या खुप जवळची आहे. कारण ती 'तापी' नदी ला संबोधून लिहली आहे. माझ गाव तापी नदीच्या काठावर, माझ बरचस बालपण ह्या नदीच्या खड़काळ पात्रात हुंदकळ्ण्यात गेलय. ही कविता मी graduation नंतर GATE preparation साठी पुण्यात असतांना लिहली होती. पूण्यातल्या संथ आणि शांतपणे वाहणारया नदीला बघून तापी नदीची फार आठ्वण व्हायची (अर्थात आताही कधी कधी होते) . तापी नदीचा तो रांगडा प्रवाह , ते खडकाळ पात्र मनात इतक बिम्बला गेलय की पुण्यातल्या त्या शांत, संथ आणि आत्ममग्न नदीवर चिडच यायची. असो आता थांबतो नाहीतर उगाच पुणेकरी मला ठोकून काढायचे ;). आता कवितेचा आस्वाद घ्या आणि मला कळु दया तुम्हाला काय वाटते ते.
****************************
एक मी आणि ती नदी,... किनारा,
अडे पाय माझा तिचा वेग न्यारा.
स्वभावे असा होतो कधी मी,
तिचा तो उधाण नित्याचा भाग सारा.

कशी मस्त खेळे मुक्त मासळी ती!
कशी स्वैर खगे उड्डाण घेती!
कसा सूर्य पाहे हरकून आत्मतेजे!
कसे स्वप्न ताजे घेउन वाहे वारा!

कसे ओल आहे हिरवे धरातल!
कसा डोल आहे लव्हाळिस हरपल!
कसे मौन माझे छेडते क्षण आहे!
जसा खड़का छेडती जलधारा.

जगा वेगळ्या ह्या मनोहर प्रांती,
जगा वेगळा मी येथे एकांती,
जगा वेगळाच मी उतरे तिच्यात,
जसा नको आहे मजला किनारा.

नुरे उगामाचा मोह ह्या मनाला,
नुरे निग़माचा दाहः ह्या मनाला.
हळु गूजते मग नदी मज कानी
"वेडा वेग घेरे मिळत्या उतारा"
...
...
...
एक मी आणि तो नदी किनारा
पुढे पाय माझा तिचा वेग न्यारा...

--भूराम.

रविवार, ६ जुलै, २००८

||अंतरंग||

मी तुला गोठले,
गोठले अंतरंग.
अंतरंग चहुकडे
रक्त रक्त पेटले.

पेटल्या मूठीत मी
आत्ममग्न झाकले.
झाकूनी चहुदिशेस
काळरंग माखले.

माखल्या रात्रीस या
तारकांनी वेढले.
वेढल्या तारकांत
रातराणी बहरली.

बहरुनी फुलाफुलात
वेदना तू हासली.
हासूनी मी ही हळूच
पापणी ही मिटली.

--भूराम.

शनिवार, ५ जुलै, २००८

परिभाष चांदण्यांचे




परिभाष चांदण्यांचे सुरेख गीत झाले,
तू चाहुलीस आला आणि निमित्त झाले.
शब्दाहूनी निराळे आयुष्य पाहीले मी
सुरात मांडता तू,सारे जिवंत झाले|

हां भास की म्हणावा हृदयात सांडलेला,
देहातला परंतू की रास मांडलेला,
जे ही रूप तुझे मजला पसंत झाले,
सुरात मांडता तू,सारे जिवंत झाले|

तो बोल कधी, पायात रुणझुणणारा,
कधी तो मत्त मदनी, हृदयात लुडबुडणारा,
हे बोल उधळलेले आता अनंत झाले!
सुरात मांडता तू,सारे जिवंत झाले|

दिक्कात शोधतो रे, मी अर्थ लागलेले,
सभोव कल्लोळात, अन् मौन सांधलेले!
अर्थात गावता मी, झाले श्रीमंत झाले!!
सुरात मांडता तू,सारे जिवंत झाले|

--भूराम

शुक्रवार, ४ जुलै, २००८

संकर



ओढणाऱ्या क्षणात, आठवणींचा स्मर,
जणू चांदणीच्या ओठावर आभाळाचा थर.
ऊर मोजत्या स्पंदनांना जाणवावे विश्व,
असल्या विश्वाशीच माझा घडतो संकर.

ओझे पाऊलांशी होते अन् थकलेले माथे ,
ऊन सावूलींशी जणू रोज गायी प्रेमगीते.
मुक्त चाहुल मनाची या जाणवावी कुणा,
पुढे काय ? काय पुढे? शंका घेतसे आकार.


किती भोवती कावळे अन् झाड़ पिंपळाचे,
पाठी गाठोडे बांधले, त्या गेलेल्या काळाचे.
वारा, झुळुक ही येता, सुरु होते सळसळ,
अन् गाठोडे खोलीता होती कावळे तयार.

अशा विश्वाशीच आता माझा घडतो संकर,
माझ्या कळत्या उराशी कुठे फुटतो अंकुर.
मज फेकूदे गाठोडे अन् ओरडू दे रे फार,
विश्वांस या कळू दे , अन् होवू दे स्वीकार.

--भूराम.

बुधवार, २ जुलै, २००८

भास

आता तरी कळू दे ,
तुझेच भास सारे,
शब्दातूनी वहाते,
नियमातली कथारे.

तो रंग शारदेचा ,
माझा कधी न तीचा.
आकाश गुंतलेले
ते सागरी किनारे.

कोणास काय सांगू
मौनात मन मागू .
तुलाच शोधतांना
सभोवात रांगणारे..

आता तरी कळू दे
आसवाचे थेंब सारे ,
माझ्याच पावलात
मलाच बोचणारे.

-भूराम.