शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

जिणे वादळते...

जड झाला माथा,
घर आता, बघ कोसळते.
चांद पावलांना,
धुळ आता, कशी रे पोळते.
***
सुर्य पोखरती ढग,
जीवा होते तगमग,
डोळ्यातले पाणि बघ,
जग किती गढुळते.

ओल वाटु लागे फ़ोल,
गोड कुणाचेना बोल,
ढळु पाहे माझा तोल,
क्षण क्षण उधळते.

नाद उलावता श्वास,
त्यास परीघाचा त्रास,
देह पंजरीचा फ़ास
भोग भोगते छळते.

धुक दाटी माया गुढं,
त्यात शोध वाटे मुढं,
पुरे संसाराचे खुळं,
नाही अजुन कळते.
***
आता रड आता,
जळ आता, दुःख काजळते.
चांद पावलांनी,
पळ आता, जिणे वादळते.

-भुराम (२६/११/२०११)

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०११

कलंदर

शंकर संकर घडे निरंतर
अंधाराची अनंत फ़ुंकर
स्पंदामधल्या द्वंदासाठी
चंद्र पुटतो उगाच मंतर

योगक्षेम ही अवघी धरती
परीस गुणांची समुद्र भरती
दाटुन येतो मनात जेता
विश्वमिठीशी होई शुभंकर

यज्ञ-तज्ञते पाउल माझे
वामन होते दिःकास मोजे
जाणुन घेतो दिव्य खुणांचा
चांदण देही मीच कलंदर.

-भुराम (८/१०/२०११)

स्निग्ध वृत्ती माझी.

ओला अजूनी होणे का ना मला जमे रे?
ही स्निग्ध वृत्ती माझी का ना मला गमे रे!

स्पंदाळुनी प्रवासे आयुष्य हे नदीसे
धारेस कापितांना का घेतसे नमे रे?

त्या कोडग्या उन्हाची ही साथ रोज वाटे
अन् सावलीशी जाता का झोपतो दमे रे?

येते, ढळूनी जाते हे दुःख आसवांचे
ना पेटतो मी त्वेषे, ना घेतसे नमे रे!

मी बेगडा, मी साधा, बेमान, मी फ़कीर
नाही, नसे कुणाचा, नात्यात ना रमे रे!

-भूराम (०८/१०/२०११)

(2) आठ-ओळ्या..contd...

(९)
लहरींचे धुंद मन,
स्पंद स्पंद आकुंचन,
कुंचल्यात जपलेले,
रंग एक, थेंब दोन.
फ़टकारे देत असे,
ओतप्रोत दिव्य ठसे,
मन माझे रंगलेरे
स्पंद स्पंद बिंबवून.

-भूराम (०१/०८/२०११)

(१०)
उधळिले असे मला
चांदण्यात मुक्त मी,
वाटले अता तरी
चांदणी दिसेल मी.
चंद्र हा तिथेच गं,
पाहुनी हसे कसा,
"व्यर्थ हा प्रयत्न गं
विखरूनी जासी तमी"
-भूराम
(१/१५/२०११)

(११)
वेड ह्या जगातले,
जगण्यातले असेच गं
गेले ते कळेच ना,
कधी कुठे कसेच गं?
कळता जरी तुला,
मोह नाही आवरे
तू खरे जाणेच ना!,
सत्य ही तसेच गं"

-भूराम...
(१/१५/२०११)

(१२)
घनतारी निळा तम गातो
क्षितिजी सुधास्रव न्हातो
परिघाशी स्पंद खुणांचा
तो तारा उद्यास्तव येतो
मी पुसतो माझी काया
ही ओल नसे ही माया
स्निग्ध होत्या जाणिवांनी
मी ’मार्गस्थ उषेचा’ होतो.

-भुराम (८/१०/२०११)

(१३)
चांद नभी जळतो गं
स्पंदनात चुरगळतो
वेदनेशी हळुवार
शांत-स्मित विरघळतो.
ह्या इथे अन त्या तिथे
गंध गंध आदळता
कर्षणे अभा निळी
धुंद कुंद वादळतो.
-भूराम

(१४)
ही वेदना नभाची
तू जाण रे मनुजा
परीघात दाटलेला
हा प्राण रे मनुजा
नसेच अंत माझा
एक हीच खंत
न लाभणे क्षितीज
तू धाव रे मनुजा?

-भूराम

(१५)
तू खुळी सजणी गं
गेली कशी भाळूनी
धाव धाव ह्र्दयाची
चंद्र खुणा माळूनी
बघ तीथे एकांती
घनगाळी मोहनिळा
न त्याचा, न असे तुझा
संमोही तो नादखुळा.
-भूराम

(१६)
किती गोड सजणी तु
यक्ष गीत गाते सदा
वाद! नभी रुणझुणता
तंत मोह हो दिडदा
घनकाया मदनारी
परिघांशी वदणारी
साहवेना, छळते गं
हाय नभी मी कलता.
-भूराम (१४/१०/२०११)

(१७)
विलगतसे चंद्र नभी
परिघाशी कुंद छबी
आद, वाद, साद, दाद
मदनाची हीच खुबी
रात रती सळसळती
हाय मिठी विरघळती
वेदनेशी लयकारी
नादखुळे निर्मळती.
-भूराम (१४/१०/२०११)

(१८)
घन तोही घनकारी
आत्मरंगे जरतारी
भिजलेल्या कवनांची
नाद उठे लयकारी
सानंदे मोद खिरे
वलयी तो शोध फ़िरे
प्राण कुणा गवसेरे
कोण होई भर्तारी!
-भूराम (१९/१०/२०११)

(१९)
प्राणांची प्रणयकला
धुंद नित मनविकला
श्वास करी स्पर्श जसा
रोम रोम परिघ मला
निज लागे रात नवी
चंद्र तोच, चांद छवी
स्फ़ुटलेल्या वचनांची
मनमंथरी शांग्रिला.
-भूराम(२२/१०/२०११)

(२०)
अंबोदी निखल मन
घनकारी विदुल क्षण
परिघाच्या गर्तेतून
आर्त उठे संकिर्तन
विलसी तो मोद जरी
मितभाषी बोध करी
ॠणमाये तू मनुजा
गर्द करी मनमंथन

-भूराम(२२/१०/२०११)

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

पाऊल

आंदण पाऊल, चांदण पाऊल
वाटेतच त्याने त्याचं गोंधल पाऊल.

इथे तिथे बघ किती ऊधळी तो श्वास
देह माझा देहास ह्या घडवी प्रवास
खुर खुर ऊधळित वेडं वेडं ते कावलं.
आंदण पाऊल, चांदण पाऊल...

रुंजी घालता तो क्षण, मागे गोफ़लेला काळ.
भिरभीर करणारी त्याची मस्त वेडी चाल.
धुळीतल्या वार्यांसंगे त्याच त्याचच धावलं
आंदण पाऊल, चांदण पाऊल...

काटे पेरल्या मातीचा त्याला झाला नाही त्रास
खाच खळग्यात त्याने सदा मांडलेला रास
कुठे भेटता देऊळ तीथे काही क्षणच थांबलं
आंदण पाऊल, चांदण पाऊल...

फ़िकिरना होती त्याला, त्याची फ़किरीच होती
चिंब भिजलेली नाती, ना त्याचा कुणी साथी
पाऊलच ते, ज्याचं आंगण चाहुल
आंदण पाऊल, चांदण पाऊल...

-भुराम

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

चंद्रातले निखारे!

माझ्या मनात आहे चंद्रातले निखारे
आकाश स्वस्थ आहे तू छेड ना मला रे.

हे विश्व यातनांचे आघात देतसे का?
मी जाणतोय आता, हो भीड तू मला रे.

मी मोकळा नदी गं, तू वाहते सदैव
धारेत वाहणे ना, ना गाठणे किनारे.

मेघास या चिरावे त्या व्यक्त चांदणीने
विद्युलते परी जे विश्वांस भासणारे.

मी पेटता अता रे उन्माद यौवनाचा
म्हातारल्या सुरांनो अता तुमी धजारे!

-भूराम (सप्टें ०५, २०११)

वृत्त: आनंदकंद
गागाल गालगागा गागाल गालगागा

सोमवार, १० जानेवारी, २०११

भर सामान प्रश्नांचे...

गोरं काळिज देहाला
भय निदान स्वप्नांचे.
आता थोड्याश्या झोळीत
भर सामान प्रश्नांचे.
खुर उधळीत धुळ
काळ धावे असा आहे.
मागे पडता काळाच्या
फ़ळ मिळते शिंकांचे.
घेतो आडोश्याला झाड
घाम येता कपाळाला.
आणि झाडाच्या ढोलीत
मिळे फ़ुत्कार सापांचे.
बघ दिशेत आजच्या
उद्या तुला मिळणार
जाता नशेत कालच्या
हाय तुला छळणार.
सांग तुझ्या पापणीला
बळ तुझे गं पंखांचे...
आता...
...थोड्याश्या झोळीत
भर सामान प्रश्नांचे.

-भूराम

शनिवार, ८ जानेवारी, २०११

(1) आठ-ओळ्या

(१)
परिघाशी धुंद अणु
केंद्राशी शांत जणू
मन पटले, वलयाशी
दिडदिडते प्राण, तनु.
विलायाशी अंत असे
उगमाशी पंथ दिसे
नियती ह्या चक्रातील
पांथस्थ मी एक मनु.

--भूराम
(४/२६/१०)
(२)
विश्वासी रुणझुणते
बिल्वराशी किणकिणते
मंत्रमुग्ध, श्वास, गंध
मन माझे क्षण जगते
परिघाच्या यातनेत
हरवले ते, मी अनेक
गुंतल्या त्या सावूलीत
क्षण माझे, पळ म्हणते.

-भूराम (०४/२७/२०१०)
(३)
व्यक्त तो निरंगी रंग
जाणीवेत मीच दंग
उधळील्या फुला फुलात
तडकलो मी अभंग
परिघाच्या यातानेशी
दुःखाच्या प्राक्तनाशी
टिचलेल्या जीवनात
मी तसाच , मी मलंग.

-भूराम (०४/२७/२०१०)

(४)
निर्मोही मम कांती
जगतो मी एकांती
विश्वास पांघरून
जोजवतो मी शांती
भोवताली कोण? काय ?
देहाशी दोन पाय
मी भ्रमात की माया
सुखात की सुखांती

-भूराम
(५/१/१०)

(५)
जातो उगाच कारे ?
निष्प्राण आहुतीस
आगिस झेलतो का
नाहि उरात मीच
दिर्घातूनी उद्याच्या
आक्रोश बांधलेला
धुरास कोंडमारा
त्याचा नसे कुणीच

-भुराम (०५/०३/२०१०)
(६)
स्मरणात रोज येतो
जगण्यातला उबारा
देहात प्राण आहे
श्वासात देह सारा.
परिघातल्या सलांना
मी व्यक्त होतसे का?
माझ्या उरात आहे
हा मोह बंद कारा.

-भुराम (०५/०३/२०१०)
(७)
विश्व मनाशी वारा,
हा देह बंद कारा.
घरगळत्या त्या काळी,
तो स्निग्ध करी पसारा.
मी मुग्ध मनाशी जगतो,
जगतो असा एकांती
डोळ्यात चंद्र खुणांचा
मग गळून जातो पारा.

-भूराम
(१०/३१/२०१०)

(८)
घन गळत्या रजकाळी
दिव्यांची किलबिल ती
निखलसत्या स्पंदांनी
ओंजळीत गलबलती.
श्वासाच्या परिघाशी
जाणिवांचे धुंद मौन
अन उलत्या विश्वासी
हे जिणेच निर-मळती.

-भूराम
(१०/३१/२०१०)

शुक्रवार, ७ जानेवारी, २०११

आकाश मंद मी बघतो...

स्निग्धा गतीमुग्धा
नियमित चंद्र मी जगतो.
विश्वाच्या स्पंद खुणांचा
आकाश मंद मी बघतो.

किरणांच्या वैष्णीव देहा
तो शांत असा प्रसवता
जाणीवे मोह गुरफटतो ,
स्पर्शाने रौरव धगतो.

धिक्कार कुणाचा करणे?
आयुष्य जणू चुरगळणे
छेडून दिक्कात मौनाला
मी गत वैभवास स्मरतो.

निर्माण देह आसुसला
नियतीचा बांध ही फसला.
उज्वले तुला जो शाप
काळोखी सुधा तो स्रवतो.

चंदने घर्षीतो वारा
नंदने कुंतले सारा
रोमात गुंतला काळ
अलगद नीरवत सरतो.

मग...
आनंदे बधीर क्षणांशी
मी बोलून जातो सारे
असेल जेही भोवती
आकाश मंद मी बघतो...
आकाश मंद मी बघतो...

-भूराम
(१/५/२०११)

रविवार, २ जानेवारी, २०११

ह्याला जीवन ऐसे नाव...

ह्याला जीवन ऐसे नाव...
मृत्यू ज्ञात तरीही त्याची, बेगडी ती धाव.
वा‌र्‍यावरती फ़ुल आणि चंद्रावरती झूल
खिश्यांमधे कोंबलेला पोटासाठी पाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

भरभर वाटभर चांदण्यांचा थर
कुणी म्हणे धुळ त्याला घेई माथ्यावर
घामेजल्या अंगाचा हा कुणा पेहराव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

चुल्ह्यावर भाकरीची थाप त्याला येई
नळावर पाण्यासाठी धाप त्याला येई
कमाई काय? दारावर तेव्हडच नाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

नव काय, जुन काय, वाहतं ते पाणी
साचलेल्या स्वप्नांमधे जाते जिंदगानी
सरड्याची ठरलेली कुंपणाची धाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

थकलेल्या देहाला ह्या फ़ुंकराची आस
बायको देते चहा बसं तेव्हडा वाटे खास
हातात घेतो रिमोट जरा M TV लाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

-भूराम
(०२ जानेवारी २०१०)

शनिवार, १ जानेवारी, २०११

संभ्रमी

काळ रेटतो, वाटा नाही
थांबलो मी पण, लाटा नाही.
आडोश्याला आहे जी बघ
भिंत एकटी, विटा नाही.

असेच असते दुःखांचे जग
अनेक दुःखी माझे ही मग,
एकटा मी तर सदाच वाटे
दुःख एकटे? कधीच नाही.

प्रयत्नातूनि प्रयत्न करतो
गरज संपता शोध ही सरतो
गरज खरीतर तशीच असते
देहच नश्वर इलाज नाहि!

किती मिळाले! प्राक्तन रडतो,
आज रेटला, उद्यास भीडतो
आज उद्याचे नातेच फ़सवे
उद्यास भीडता आजच होई.

नसे संभ्रमी याहून काही
दुःख असे हे सलत राही.
सवयिचे मग होते जगणे
रुते वेदना, काटा नाहि.

-भुराम
(01/01/2011)