शनिवार, २८ एप्रिल, २०१८

पांघर

तो :
----
मला वाटे बोलावेसे 
नाही बोलणे कधीच.
डोळे आसवांचे झाले
पाया लागली गे ठेच. 

सांज कळली ना कुणा
नाही कळले गुपित. 
जेही मनांत साठले 
त्याची कुणा देवू वेच. 

मना पोखरून झाले
पणा ओरखडे गेले
गेल्या मढल्या दिसाचे
पुन्हा पडे नाही पेच. 

आता गाभूळ बोलतो
आणि पेलतो बाभूळ 
दूर आभाळ दिठीला
कसे कळणार हेच. 

ती :
----
नाही नसू दे नात्यात 
तोच गोडवा कालचा
तळहातावर रेषा
नको वाटू दे रे खाचा.

घडे घडणे घडते
मन जडणे जडते
किती गुंतवावे कुणा
प्रश्न असे ज्याचा त्याचा

रोज ओघळू दे ऋण
गेले जावू दे वाहून
नको साठवू कुणाला 
नको वेचू त्याच काचा. 

गेले क्षण, न्हाले मन  
रात नवी, नवे ऊन 
रोज प्रवास नव्याने 
नित पांघर उद्याचा 

-भूराम (पुणे ४/२८/२०१८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा