रविवार, २८ ऑक्टोबर, २०१२

*** शुभ रात्री ***

तू थांब ओंजळ, वाऱ्यावरची,
तू देह अगतिक, ओली धरती
तो चांद ऋतूचा किंकर करतो
अन प्राण तुझा ग येतो भरती.

रात खुणांचे किरकिर तारे
स्पंद ॠणांचे बंधन सारे
सभोव जाते गलधून आणि
मौन झुलावे ओठांवरती . 

स्थिर होवूदे श्वासांमधले
ते भाव अनोखे घुंगुर वदले
नाद दिवाणा असे तो त्याचा
वेचून घे तो तुझ्याचसाठी.  

ते स्वप्न खुणाचे अंथर आता
ते स्पर्श क्षणांचे पांघर आता
दिवा विझून तुझ्या बाजूचा
घे नीज मिठीशी सखे सोबती.

-भूराम (१०/२८/२०१२)

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१२

** का? **

आज माझ्या वेदनेला का कळेना दुःख तिचे!
सावल्यात पेटलेल्या चांदणीशी सख्य तिचे!

रान झाले श्वापदांचे मज कळेना ते कसे ते?
गुंजरावी पाखरांना शांत केले तू कधी ते?

वेदनेच्या स्पर्श राती गोढलेला श्वास येतो.
ते उसासे, ते दिलासे, थांबलेला भास होतो.

सांग साये पाठमोरी तू बिलोरी हासणारी,
आज मुग्ध का असे तू मुक्त शब्दे भेटणारी?

प्राण देही मोह वारा, स्पंदनांचा तो पसारा,
वेदनेच्या ह्या घडीला दूर वाटे का किनारा?

-भूराम
१०/२१/२०१२

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१२

** भोवताली तुझाच हा रव **

ही पाखर बोली माया
क्षिताजीशी येते अलगद.
नयनांच्या काठावरती
होडीचा भिजतो कागद. 

हे सुन्न किनारे होती
स्पंदांचे घुंगुर गाणे.
लाजेचे जांभूळ वेडे
चंद्राचे तुझे उखाणे. 

वाऱ्याच्या झुळकी वरती
पदराची थरथर येते,
पाण्याच्या पटलावरती
मिणमिणते बिल्वर ना ते?

बघ तुझेच वाटे मजला
ताऱ्यांचे हसणे वेडे.
कानाशी कुजबुजणारे
ते हळवे कुंतल वेढे

स्पर्शांशी असेच येती
हे आसू भरले आठव.
तू दूर कुठेही असली
भोवताली तुझाच हा रव.

-भूराम (१०/१४/२०१२)

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१२

**मी**

मी आहे त्या विस्मृतीचा,
क्षण व्यापीत दाह कृतीचा,
का आहे स्पर्श श्रुतीचा,
स्पंदातील नेह गतीचा!
 

उधळून हे मोहातील बंध,
तो प्रत्येक नियतीचा अंध,
मी असतो सांखिक आणि
नसतो त्याच मितीचा.
 

'मी' गौण कुणाशी आहे
आराधी देव सदा हे
'मी' कोसळता त्या अर्थी
होतो स्वाह धृतीचा.
 

'मी' कर्म उद्याशी नाही,
आहे जे सदोनीत वाही ,
का प्रश्ना मधली कुंती
नाकारे पोर नियतीचा?
 

उर्जेचा देहातीत शून्य,

जाणेना 'मी' अहंमन्य.
तिमिराला चिरतो तेजे
जाणता 'मी' सवितेचा.

कारण...


 
'मी' असतो, जसा तो आहे,
'मी' राहील जसा तो आहे
जाणीव असावी फक्त,
''मी' आहे जसा मी आहे.'
 

-भूराम (१०/१३/२०१२)
 

स्वतःला नाकारू नका, आणि स्वतःला स्वीकारू ही नकाच
फक्त जाणा स्वतःला आणि बघा क्षणात अंधकार कसा दूर होतो तो.
-स्वः 'मी' समर्थ
-स्वामी सम अर्थ
-स्वाह 'मी' , स्वाह 'मी', स्वाह 'मी', स्वाह 'मी', स्वः 'मी', स्वामी समर्थ
 

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२

**डोह**मी माझा मोहीत देह
स्पर्शाचा चांदण स्नेह
विरात्या विश्व सुराशी
चाहूल, तुझा संमोह.

मी कुण्या संचित देशी
वाटे खुळा दरवेशी.
तू संज्ञा माझी होता
दाटून येतसे कोह.

हे स्वप्न सुरांचे गीत
अजून न कळते प्रित
धरतीच्या संयत वेळी
क्षितीजाचा होतो डोह!

-भूराम १०/१०/२०१२