(१)
परिघाशी धुंद अणु
केंद्राशी शांत जणू
मन पटले, वलयाशी
दिडदिडते प्राण, तनु.
विलायाशी अंत असे
उगमाशी पंथ दिसे
नियती ह्या चक्रातील
पांथस्थ मी एक मनु.
--भूराम
(४/२६/१०)
(२)
विश्वासी रुणझुणते
बिल्वराशी किणकिणते
मंत्रमुग्ध, श्वास, गंध
मन माझे क्षण जगते
परिघाच्या यातनेत
हरवले ते, मी अनेक
गुंतल्या त्या सावूलीत
क्षण माझे, पळ म्हणते.
-भूराम (०४/२७/२०१०)
(३)
व्यक्त तो निरंगी रंग
जाणीवेत मीच दंग
उधळील्या फुला फुलात
तडकलो मी अभंग
परिघाच्या यातानेशी
दुःखाच्या प्राक्तनाशी
टिचलेल्या जीवनात
मी तसाच , मी मलंग.
-भूराम (०४/२७/२०१०)
(४)
निर्मोही मम कांती
जगतो मी एकांती
विश्वास पांघरून
जोजवतो मी शांती
भोवताली कोण? काय ?
देहाशी दोन पाय
मी भ्रमात की माया
सुखात की सुखांती
-भूराम
(५/१/१०)
(५)
जातो उगाच कारे ?
निष्प्राण आहुतीस
आगिस झेलतो का
नाहि उरात मीच
दिर्घातूनी उद्याच्या
आक्रोश बांधलेला
धुरास कोंडमारा
त्याचा नसे कुणीच
-भुराम (०५/०३/२०१०)
(६)
स्मरणात रोज येतो
जगण्यातला उबारा
देहात प्राण आहे
श्वासात देह सारा.
परिघातल्या सलांना
मी व्यक्त होतसे का?
माझ्या उरात आहे
हा मोह बंद कारा.
-भुराम (०५/०३/२०१०)
(७)
विश्व मनाशी वारा,
हा देह बंद कारा.
घरगळत्या त्या काळी,
तो स्निग्ध करी पसारा.
मी मुग्ध मनाशी जगतो,
जगतो असा एकांती
डोळ्यात चंद्र खुणांचा
मग गळून जातो पारा.
-भूराम
(१०/३१/२०१०)
(८)
घन गळत्या रजकाळी
दिव्यांची किलबिल ती
निखलसत्या स्पंदांनी
ओंजळीत गलबलती.
श्वासाच्या परिघाशी
जाणिवांचे धुंद मौन
अन उलत्या विश्वासी
हे जिणेच निर-मळती.
-भूराम
(१०/३१/२०१०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा