रविवार, ७ सप्टेंबर, २००८

मीच मृत्युंजय आहे...


अनेक लक्ष, अनेक ध्येय आहे
इथे थांबणे आता व्यय आहे.
’पुढे चालणे’ कर्म हेच जन्मभर
मिळाले जेही मानूनी स्नेह आहे.

आता लक्षू दे मला तोच डोळा
जिथे अर्जूनाने रोवला बाण वेडा
आता लक्षू दे पून्हा ते श्वान मुख
ज्या एकलव्ये केले क्षणे मुक.
रिंगणे उतरू दे होवूनी मज कर्ण
अर्जुना जळू दे पाहूनी माझा वर्ण
असे संकटे खेळू दे भीष्म युध्द
मग कृष्ण हाता भाग घेणे आयुध.
या संर्घषगीता ऐक कैशी लय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

जेव्हा शकुनी हात खेळती धुर्तचाल
पणा लावीतो युधिष्ठीरी जेष्ठ्भाल
द्रोणा शीर कटे ऐकता मुर्ख थाप
जेव्हा सत्य-मिथ्या मोजता एक माप.
जेव्हा जयद्रथा अर्जून येई सामोरा
तेव्हा काय तो ग्रहणी हो सुर्य तारा.
जेव्हा वाढतो अर्जुना कर्ण-धाक
तेव्हा काय रुते धरी ते कर्ण चाक.
ऐशा नियतीची मजला सवय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

अजुनी द्रोपदी नग्न होते सभेत
अजूनी एक कुंती पोर देते नदीत
अजूनी द्रोणपूत्र दूध पितो पिठाचे
गुरुस एकलव्य रक्त देतो बोटाचे
अजूनी रोज कुब्जा आसवी वाहे प्रश्न
अजूनी शापग्रस्त रोज होतोय कृष्ण.
स्व-अस्तित्व शोधे अजूनी रोज कर्ण
अन्याये सवियीचे झाले ध्रुतराष्ट्री मौन
अशा जगतातील एक मी, होय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

निराशेस मारक रक्त आहे ह्या देहात
कितिही अभिमन्यू ठार होवू दे व्युहात
कितिही रोज इंद्र उभे राहू दे दारात
असे दानविराची वैभवी माझी जात
मीच गंगापूत्र, मीच तो पंडूपूत्र
होय दुर्योधनाचा मीच आहे मित्र
मीच आहे तो, इतिहास भारताचा
मीच शिल्पकार आहे तो उद्याचा
मी तरुण, मीच मृत्युंजय आहे...
इथे थांबणे आता व्यय आहे.

--भूराम...
१७/०६/२००२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा