शनिवार, १६ मे, २०२०

दे माणुस पेरुन

काळीज भोगतो काळजी वाहून
काळ सोकावला काळवले ऊनं।।

जगाच्या परिघी थांबले का कुणी
जन्मला जो येथे जातोया मरुनी.
बाकी मग राहते काळ आणि ऋणं.
काळ सोकावला काळवले ऊनं।।

धावतो माणूसं कुणामागे रोज
घड्याळाला त्याच्या वाटतेरे ओझं.
थांबेना तू माणसा काळ ओळखूनं.
काळ सोकावला काळवले ऊनं।।

जराचरं भोवताली श्वास घे तू थोडा
मनू तुझ्या विकासाचा लगाम तो घोडा.
त्याचा हक्क बजावे तो काळ ओळखून.
काळ सोकावला काळवले ऊनं।।

किती गेले गतकाळी ते दंभ अहंकारी
धर्म जात रंग पंथ ह्यांची पेरणी विखारी.
काळ सांगे वेळ हिच दे माणुस पेरुन.
काळ सोकावला काळवले ऊनं।।

- भूराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा