भाकरीसाठी शहर गाठले, जिवासाठी गांव
पाठीवरती पोट बांधले , पोटावरती घाव.
*
नदी तोडली, फोडले डोंगर,
आकाशावर फिरले नांगर
निसर्गाच्या परीट घडीवर
हे विकासाचे पेरले गाजर
का तुला रे कधी न कळला, किती तुझा तो भाव.
*
जगण्याच्या तू धडपडीत होता
गरीब कधी तू दलित होता
माणसांच्या ह्या सत्ते मधला
जोड तोडी चे गणित होता.
मतदानाच्या यादी मध्ये तुझेच ठळक ते नाव.
*
तुलाच धर्म तुलाच जाती
तूच काफिर तूच जमाती
सोडीता बाण मुखी श्वानांच्या
तुझाच अंगठा कापुनी घेती
माणुसकीच्या युद्धामधे तुझीच पडते धाव
*
आज जरी हा नसे रे पाठी
उद्या तुझा रे तुझ्याच साठी
पायपीट ही जरी निरंतर
घामामृत घे हे सदा ललाटी
धीर धरुनी खेळ नेटका घडी घडींचा डाव.
*
भाकरीसाठी शहर गाठले, जिवासाठी गांव
पाठीवरती पोट बांधले , पोटावरती घाव.
-भूराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा