का मोहतो रे मोहना गुंतले मी निळी खुळी
का छेडतो रे वेदना हा सुर गात्री ओघळी ।।
स्पर्श बांधला मी तुझा हा स्पंद वेचूनी द्विजा
रान भान सैर भैर शोधे तुलाच गोकुळी।।
*
कसे भरु मनात हे
तुझे अमित रुप रे
बंद पापण्या कडा
दवे अमिट खुप रे
तुलाच स्थापिले सख्या मन मर्नात देऊळी।।
*
दुराते नादे बासुरी
उरात प्राण पोखरी
मोर केकतो जसा
तुलाच सादे बावरी
केवडा तुझ्या मिठीचा जाळू दे या कातळी।।
*
तुला कळे ही भावना
माझी युगांची साधना
तुझी सदा समर्पिता
तुझीच व्हावी कामना
तुझ्या कटाक्षी रे सख्या फुले फुलात मी कळी ।।
*
किती हे देह धारीले
किती मनास मारीले
कोरड्या जगी जगून
तुझ्यात स्वत्व हारीले
प्रेम वेणू छेड ती फुंक माझ्या पोकळी।।
*
का मोहतो रे मोहना गुंतले मी निळी खुळी
का छेडतो रे वेदना हा सुर गात्री ओघळी ।।
-भूराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा