रविवार, १४ सप्टेंबर, २००८

तो वेडा की मी वेडा?


मळकटलेल्या रस्त्यावरती
मळकटलेली काठी घेवून
मळकटलेल्या अंगावरती
मळकी-फ़ाटकी कपडे लेवून
मळकटलेल्या पायांनी या
चालत होता अनवाणी...
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

चिले पिले अवती भवती
कलकल कलकल करीत होती
हसत खिदळत दगडे मारून
घाव अंगावर कोरीत होती
तो बिचारा काठी हातची
भिरकावे मधेच वैतागूनी
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

चेहरी आणून भाव बोलतो,
"करेल जादू टोणा मी,
उंदीर बनवून एकेकास
भरेल माझा गोणा मी".
घाबरती का? बच्चे आजची!
असल्या युक्ती नसे जुमानी.
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

शिव्या ओठी, डोळ्यात लाली
ओरडला तो आदळून काठी
क्षणात पांगूळली इथे तिथे,
जेव्हढी झाली होती दाटी
बदलू लागली वाट आपुली
येती जाती माणसं शहाणी
तो वेडा तो वेडा तो
चहू दिशेतून एकच वाणी...

कोप-यात बसला चोरून अंग
सावलीत काही थरथर होता
माणूसकीच्या ह्या जगावर
कुठला ’साप’ सरसर होता?
डोळ्यात मग आभाळ गोठले
आसवात सारी घळली गाणी.
"तो वेडा की मी वेडा ?"
हळूच सुर घुमला कानी...!

-भूराम
१३/७/२००१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा