शनिवार, ३० मे, २०२०

मृत्यू

तू तेव्हढा का रे शून्य शोधतो हा
येता मनांत सारे प्रश्न ठेवतो का?
जाणे जगा जगणे सत्य हेच आहे
मृत्यूस पाहताना फक्त हासतो का?
रक्ताविनाही जन्म होतसे इथे रे
जन्माविनाही मृत्यू होतसे इथे रे
बोध शोक त्यांचा दग्ध भासतो का?
मज वेदना कळू दे आरंभ सांडणारी
डोळ्यात ओघळू दे प्रारंभ मांडणारी
प्रारंभ हा सदा रे प्रारंभ राहतो का?
शून्यातल्या जगाने शून्यात लुप्त व्हावे
शून्यास मांडताना शून्यात व्यक्त व्हावे
शून्य कितीहा सांग शून्यात राहतो का?
बोल...
येता मनांत सारे प्रश्न ठेवतो का?

-भुराम 



शुक्रवार, २२ मे, २०२०

🌹 मना 🌹

————-
न पाहता मना तुला
तू पाहीले मनातले
न बोलता कधी कुठे
का वाचिले मनातले ?
सांडील्या दवा तुझे
ओल वेचिता कधी
आसवे कधी कसे
सांडीले डोळ्यातले.
मनोमिता नभा तिरी
ती सुर्य रेख पाखरी
आठवांनी रेखले
का स्पंद तू उरातले?
मना तुझ्या ऋणात मी
वेदना क्षणात मी
दुजा नव्हे तुझाच मी
तू जाणिले मनातले. 
-भूराम

शनिवार, १६ मे, २०२०

आव्हान

——🌸———
पेलणे आव्हान आहे
जिंकणे सम्मान आहे
घडता मी ह्या घडीला
होणे मी निर्माण आहे.
ठेवतां मी शब्द खाली
पेटती साऱ्या मशाली
शोध सोपी वाट माझी
सोडीले निशाण आहे.
जा रे सांगा ह्या जगाला
विध्द झाल्या जाणिवेला
शरपंजरी देही माझ्या
पेटलेला प्राण आहे.
मी निघालो वाट माझी
ती उद्या पहाट माझी
रोखणे नाही मला मी
उठविले रान आहे.
त्या कुणा आनंद होतो
कोसळता मी धरेला
सांगा त्यांना आजपासून
ताठ माझी मान आहे.
-भूराम
________🌷________

हेका

______🌹_______
स्पंद बोलतो बोलका
चांद झरतो हलका
गोड साखरी मनाला
दे आकाशीचा झोका
उन कवडसे वेडे
तुला बिलगले थोडे
छान बिलोरी क्षणाला
घे तू नादखुळी ठेका.
तुझ्या पाखरी ओठात
चांदण्यांची गं वरात
तुझ्या भोवताली सदा
ठेव हिरवल्या सुखा.
प्राण भरल्या डोळ्यात
रोज स्वप्न पेरी रात
रोज जगेल उद्याला
हाच भारी ठेव हेका! 

-भूराम

का मोहतो रे मोहना

का मोहतो रे मोहना गुंतले मी निळी खुळी
का छेडतो रे वेदना हा सुर गात्री ओघळी ।।
स्पर्श बांधला मी तुझा हा स्पंद वेचूनी द्विजा
रान भान सैर भैर शोधे तुलाच गोकुळी।।
*
कसे भरु मनात हे
तुझे अमित रुप रे
बंद पापण्या कडा
दवे अमिट खुप रे
तुलाच स्थापिले सख्या मन मर्नात देऊळी।।
*
दुराते नादे बासुरी
उरात प्राण पोखरी
मोर केकतो जसा
तुलाच सादे बावरी
केवडा तुझ्या मिठीचा जाळू दे या कातळी।।
*
तुला कळे ही भावना
माझी युगांची साधना
तुझी सदा समर्पिता
तुझीच व्हावी कामना
तुझ्या कटाक्षी रे सख्या फुले फुलात मी कळी ।।
*
किती हे देह धारीले
किती मनास मारीले
कोरड्या जगी जगून
तुझ्यात स्वत्व हारीले
प्रेम वेणू छेड ती फुंक माझ्या पोकळी।।
*
का मोहतो रे मोहना गुंतले मी निळी खुळी
का छेडतो रे वेदना हा सुर गात्री ओघळी ।।

-भूराम

दे माणुस पेरुन

काळीज भोगतो काळजी वाहून
काळ सोकावला काळवले ऊनं।।

जगाच्या परिघी थांबले का कुणी
जन्मला जो येथे जातोया मरुनी.
बाकी मग राहते काळ आणि ऋणं.
काळ सोकावला काळवले ऊनं।।

धावतो माणूसं कुणामागे रोज
घड्याळाला त्याच्या वाटतेरे ओझं.
थांबेना तू माणसा काळ ओळखूनं.
काळ सोकावला काळवले ऊनं।।

जराचरं भोवताली श्वास घे तू थोडा
मनू तुझ्या विकासाचा लगाम तो घोडा.
त्याचा हक्क बजावे तो काळ ओळखून.
काळ सोकावला काळवले ऊनं।।

किती गेले गतकाळी ते दंभ अहंकारी
धर्म जात रंग पंथ ह्यांची पेरणी विखारी.
काळ सांगे वेळ हिच दे माणुस पेरुन.
काळ सोकावला काळवले ऊनं।।

- भूराम

#जिंकेल #युध्द #सारी.

घ्यावा हा सुर्य हाती
व्हावी त्वचा उन्हाची
भय माखल्या उद्याला
दे साउली क्षणांची.

हे युध्द रोज आहे
प्रारब्ध रोज आहे
चिंता उगा कशाला
ना मोज आहुत्यांची.

जरी बांधला ईथे मी
उरी मोकळाच आहे
जीर्णे शरीर झाले
तरी पेटलाच आहे.

मृत्युस कोण भीतो
मृत्य असे भिकारी
जीव देईल हे  दान
न गुर्मी जिंकण्याची

हा दंभ नाही माझा
घे गोंदवुनी माथा
जिंकेल युध्दे सारी
मी आजची उद्यांची.

-भूराम

घडी घडींचा डाव

भाकरीसाठी शहर गाठले, जिवासाठी गांव
पाठीवरती पोट बांधले , पोटावरती घाव.
*
नदी तोडली, फोडले डोंगर,
आकाशावर फिरले नांगर
निसर्गाच्या परीट घडीवर
हे विकासाचे पेरले गाजर
का तुला रे कधी न कळला, किती तुझा तो भाव.
*
जगण्याच्या तू धडपडीत होता
गरीब कधी तू दलित होता
माणसांच्या ह्या सत्ते मधला
जोड तोडी चे गणित होता.
मतदानाच्या यादी मध्ये तुझेच ठळक ते नाव.
*
तुलाच धर्म तुलाच जाती
तूच काफिर तूच जमाती
सोडीता बाण मुखी श्वानांच्या
तुझाच अंगठा कापुनी घेती
माणुसकीच्या युद्धामधे तुझीच पडते धाव
*
आज जरी हा नसे रे पाठी
उद्या तुझा रे तुझ्याच साठी
पायपीट ही जरी निरंतर
घामामृत घे हे सदा ललाटी
धीर धरुनी खेळ नेटका घडी घडींचा डाव.
*
भाकरीसाठी शहर गाठले, जिवासाठी गांव
पाठीवरती पोट बांधले , पोटावरती घाव.

-भूराम 

गौण

*
नको भार आणि नको त्राण होवू
न जन्मा असा तू नको छान होवू.
*
अहंता नियंता नसे गाठ ह्यांची
अहंका तुझ्या त्या नको मान देवू.
*
कुणी फुंकीता ही स्फुलिंग त्वेषे
चला तेज त्यांना सुखे दान देवू.
*
असा मी असामी रमे नित नामी
अमर्ता निरंकी चला प्राण होवू
*
किती गौण आहे मरणे इथे रे
पुन्हा जन्मू आणि नवे गान होवू,

-भूराम

मानवा

******
धर्म हा नसतो माझा तुझा
धर्म हा असतो धर्म
देव ही नसतो माझा तुझा
आपुले असते कर्म
जगणाऱ्याने गतकाळातील
का कोरावी थडगी?
मेल्यावरही जिवंत राहते
पोटामधली खळगी!
दान तुला जर देता आले
हात ही देशील दान
माणूस होता माणसांसाठी
हो प्राण्यांचा प्राण
वेळ कोडगी निघून जाईल
बदलून जाईल सत्ता
तिचाच शेवटी फेकील ती तर
एकच हुकमी पत्ता.
उपरे आम्ही मुर्ख जरी हे
वाटे बोल हे मांडण
निसर्गाशी तुझे मानवा
थांबव आता भांडण.

-भूराम

तुझ्या भेटी

काहीसा तो चांद,
ठेव माझ्यासाठी
काळजाच्या गाठी, तुझ्या भेटी।
बहरते रान,
निळेसे हे छान
ओघळतो प्राण, तुझ्या भेटी।
सावरते रुप,
निरखू दे खुप,
जळतो हा दिप, तुझ्या भेटी।
दुरात चांदणे,
साखर पेरणे
रोज येणे जाणे, तुझ्या भेटी।
कळते कौतुक,
जगू दे हे सुख
मन हे सुरेख, तुझ्या भेटी।
काहीसा तो चांद,
निखळला बंध
रातराणी गंध, तुझ्या भेटी।

-भूराम