शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

दत्ततत्वच

आत्मे प्रकाश होती ,
स्पंदे वेगात होती
ओघळ मन्मतीतील 
हरखून जणू सभोवात होती
बंधने सारी तुटलेली
मी तू दुरी मिटलेली. 
दुःखे विरली, बोथटलेली
अनुभूतीच ही सभोवात होती
क्षणाचाच होता तो सारा खेळ
ओढ ज्याची जिवापेक्षा गोड
रिते आणि मुक्त पूर्णत्वच हे 
दत्ततत्वच ही सभोवात होती.

-भुराम

गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

|| पूर्णत्वाची रात ||

मौनें मनात आहे
आत्मे सुरात आहे
आकाश तत्वे नूरावी
अशी स्पंद रात आहे

ते मोकळेच जळणे
उष्ण श्वासे घळणे
अग्नी तत्वे नूरावी
अश्या मिठीत रात आहे

डोळ्यास डोळा कळावा
आसवांनी तो ओघळावा
जल तत्वे नूरावी
अशी तरल कात आहे

गंध मुग्ध दरवळता व्यक्त
ना तुझा ना माझा फक्त
वायू तत्वे नूरावी
अश्या क्षणी क्षणात आहे

अधरा धरे ना धरती
धरती ना कळे शरीर ती
पृथ्वी तत्वे नूरावी
जडत्वें ना अता ज्ञात आहे

पंचतत्वे न उरले काही
जिव शिवातुनी हा प्रवाही
पुर्ण तत्वातूनी उरावी
पूर्णत्वाची अशी रात आहे.

-भुराम
१२/२०/२०१८

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

।।आभाळ।।

तिथंही आठवण होती आणि इथंही
आभाळाला ये म्हटलं तर म्हणाला,
“नको तुझ्या प्रत्येक
शब्दात
खुप चमका निघतात
काळजात
भारलेल्या नजरेत
गारठून येते फार
जवळ आलो तर
गडगडायला होतं
त्या ऱ्हदयीच्या
हर एक धडधडीने
नको मित्रा नको
तुच कोसळतो मग
मिठीत मला घेवून
लोकांना वाटतं की
मीच कोसळलोय
आणि
ही माझ्या मित्राचीच
आसवं आहेत येव्हढंही
बोलवलं जात नाही मग,
ह्या आवंढून आलेल्या
कंठाला.
नको मित्रा नको”

-भूराम

(6) आठ-ओळ्या..contd...

कोण जाणते काळीज
कोणा वाटते काळजी
इतरांची यदा तदा
चाले रोजची मरजी.
सुखा बांधावे सुखाने
दुःखां उकलावे काही
जगण्याचा खटाटोप
नाही नसतो फरजी

****

भिजलो जोवर,
विझता विझता
विज नभाची
होवुन गेलो.
भिजला मोहर,
भिजली माती,
गौण कलेवर
ठेवून गेलो.

-भूराम

वेडी नदी

जगण्यातली श्रीमंती
मज मोजता न आली,
“आकाश वेचतो का! “,
----------वेडी नदी म्हणाली. 

जगण्यातली उसंती
मज वेचतां न आली
“झेलं पावसां कधी तू”, 
----------वेडी नदी म्हणाली. 

जगण्यातली भ्रमंती
किती किती ही झाली
“फुलवू रे गावं शेतं”,
----------वेडी नदी म्हणाली. 

जगण्यातल्या ह्या अंती
माझी किती ती आली.
“अस्थी दे नेते संगे”,
----------वेडी नदी म्हणाली. 

-भूराम

कोष

अनेक वाटा अनाथ होत्या ,
मनांत होत्या तुझ्या कथा
तुला कळे जश्या सुखाच्या
तश्याच माझ्या मनी व्यथा.

उगा म्हणावे अतूट नाते
असंख्य फाटे तुझ्या मिठी
जरा जगावे म्हणून वाटे
तुटून जाईल सदा भीती

साराच मोह, असा घोळ होता
जसा गोड होता सहवास हा
तुला कळाले जरी न काही
तुज कळून होता प्रवास हा.

कशास आता तुला दोष आणि
कशांस तुझा धरू रोष मी
घडे जेही घडते असेच घडते
बघ सोडतोय तुझा कोष मी.


-भूराम

पारिजात

मी सावूली मिठीतल्या उन्हात गं
त्या काहूरीच सरूनी गेली रात गं
कळे कसे कधी तुला मी सांगणे
अजूनी मुक्त मी तुझ्या स्पंदनात गं.

सोहळाच दवांसवे तो सांडला
तो सुर्यही लालबुंद मस्त भांडला
कळे कसे कधी तुला हे भांडणे
अजूनी व्यक्त मी गुलाबी गारव्यात गं.

पारिजात अबोल तो गं ओघळे
भारावल्या त्या अंगणास ही कळे
कळे कसे कधी तुला हे जे घडे
अजूनी फक्त मी तुझ्या पावूलात गं.

-भूराम

फकीर

कधी न कळले तुला
मनातले माझ्या काही
दूर बांधल्या चंद्राला
का तुझीच देवू ग्वाही?

असाच होतो उदास
हळूवार घेतो श्वास
डोळा डोळा भरलेला
जो कधीच खळला नाही.

शांत शांत निजतो मी
अंधारता विझतो मी
बेफिकिर जरा दिसलो मी
पण हा फकीर कुणाचा नाही.

-भुराम