गुरुवार, १६ जून, २०१६

अवघ्या अंधारात

त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
बघत होतो भरकटलेल्या देहाकडे
एका अनोळखी नजरेने जी तुझीही होती
नेहमीच माझ्या वाटेला आलेली.
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
शोधत होतो लामणदिवा पार्वतीच्या हाताने
गणपती तिने सजीव केला
अगदी तश्याच काहीश्या आशेने.
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
कानाने वेचत बाहेरची सारी पडझड
त्याच लयीत होती माझीही धडपड  
कदाचित माणसच असतील विखुरलेली ?
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
आठवत नव्हता भूतकाळ माझा,
आज हा असाच!, उद्या सापडत नव्हता.
थांब थोडी साद घालून रडू दे
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
डोळ्यांची बुबळ जाणवत होती भिरभिरणारी
श्वासांची फुंकर होती गोड वाटणारी
जिवंत होतो हो खरच की जिवंतच होतो!
*
भूराम
६/१६/२०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा