सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

देहता

जाणिवा देहता मनातली भोगतो
चांदणी स्नेह तो उरास ह्या दाहतो.
ना कळे मन्म तो कुणास बाधला कधी
सावलीस छेडता का उगाच धावतो?
शून्य बांधल्या करी गोठलेली आसवे
ओझे पेलुनी खुळी वाटसरू कासवे
सांग त्या दिशेस मी का उगाच रेटणे
भेटता जिथे कुणी ना कुणाचा राहतो..
शांभवी तो शंख हा हुंकारत्या धुनीतला
छेड छेड यातना स्वीकार तू ऋणी मला
पाखरांशी भेद मी पेलतो आकाशता
अन ठेवला देह हा पेटलेला पाहतो
अन ठेवला देह हा पेटलेला पाहतो ..

-भूराम    12/26/2016

शुक्रवार, १ जुलै, २०१६

मनक (अश्वत्था)

मी अश्वत्थासम भोगी, की स्पंद नितीचा योगी
त्या अंधाराशी अलगद जाणीवा सदा संभोगी.

तो व्यक्त मनातील तारा , की संकर्षी  घन  वारा.
अस्वस्थ सभोवी होता, मी मक्त निळा नीत मोघी.

ती सांज नवी नीत नादी, आवेशी रूढ संवादी
प्रारब्ध कळे ना तिजला , मी क्षुब्ध असे नीत यागी.

सांभाळ स्रवातील गुंता, जो  झुळझुळ जातो पंथा
ओघळणारा डोळा आणि डोळ्यांत खळे निर्मोघी.

निरांजन हाती धरता , नीत प्रार्थना तुझी मी करता
दिसला का तू मजला, मी जसा तसाच  तू रोगी.

-भूराम
७/१/२०१६
   

गुरुवार, १६ जून, २०१६

अवघ्या अंधारात

त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
बघत होतो भरकटलेल्या देहाकडे
एका अनोळखी नजरेने जी तुझीही होती
नेहमीच माझ्या वाटेला आलेली.
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
शोधत होतो लामणदिवा पार्वतीच्या हाताने
गणपती तिने सजीव केला
अगदी तश्याच काहीश्या आशेने.
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
कानाने वेचत बाहेरची सारी पडझड
त्याच लयीत होती माझीही धडपड  
कदाचित माणसच असतील विखुरलेली ?
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
आठवत नव्हता भूतकाळ माझा,
आज हा असाच!, उद्या सापडत नव्हता.
थांब थोडी साद घालून रडू दे
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
डोळ्यांची बुबळ जाणवत होती भिरभिरणारी
श्वासांची फुंकर होती गोड वाटणारी
जिवंत होतो हो खरच की जिवंतच होतो!
*
भूराम
६/१६/२०१६

रविवार, १२ जून, २०१६

वळून तिने बघताच.

जाणिवा जरा थांब तिथं
वळून बघू नको मागं.
पावसाला ही तेच सांगितलय
कोसळून जावू नको मागं.
डोळातल्या त्या ओढीला
ओढून ठेवले आहे जरा,
ऊरातल्या धडधडीला
दडवून ठेवलं आहे जरा.
वळून तिने बघताच
मोकळं सारं होईल.
पाऊस कोसळेल,
उरात धडधडेल,
जणिवांची धावतील
रोमारोमातून साऱ्या
आणि
डोळ्यातलं अगदी
सारं सारं कळेल. …

जाणिवा जरा थांब तिथं
वळून बघू नको मागं.

-भूराम
६/१२/२०१६

शनिवार, ११ जून, २०१६

(3) आठ-ओळ्या..contd...

(२१)
माझे डोळे तुझा श्रिङ्गार
माझे कान तुझा झंकार
माझे ओठ, तुझा अंगार
माझा स्पर्श तुझाच विचार
माझा देह तुझा स्वीकार
जावे अस्तित्वाच्या पार
व्हावा  स्पंद मेघ मल्हार
***
(२२)
ओघळणारे खळखळणारे
खळले डोळ्यांमधले क्षार
गालांवरचे पुसले काही
भिडले ओठांन्ना अलवार
प्राण ओवला अलगद तुटला
क्षण मन मोत्यांचा तो हार
दूर असे अन अता अनोळखी
वेगळाच एक तो अह्नकार
***
-भूराम
६/१२/२०१६

रविवार, २२ मे, २०१६

नाती

नाती
नाही जगवता आली आपल्याला
जगताही नाही आलीत.
प्रवासात ...
मैलाची दगडे खुप आलीत
पण...
अंतरे मोजता नाही आली.

थकलो शीण आला
जरा विसावाही घेतला.
सोबत बांधून आणलेली शिदोरी
संपली तशी पुन्हा बांधूनही  घेतली.
पण...
प्रत्येक आलेल्या वळणावर
मिळालेल्या नात्यांची
गोडी कधी चाखता नाही आली.

आता कधी कधी,
गोंजारत कुरवाळत
विचारत असतो ह्या आत्म्याला,
"हे सारं करून काय कमावलेस?
आणि काय गमावलेस?"

तोही मख्ख!
आता उत्तर देइनासा झालाय.
कळले का तुला !
एकटंपण फार वाइट असतं.

-भूराम
5/22/2016

शनिवार, २६ मार्च, २०१६

वेदना

असंथातुनी संथतो स्पंद एक ,
अबोधातुनी बोधतो स्पंद नेक
जरा वेगळी सांज येता सलांची,
झरे निर्मिती वेदनांची सुरेख.

अभोगातुनी भोगता श्वास गुंता
निळा मैथुनी धावता एक पंथा
मिळे हे किती अनादी अतर्क्य
घडे पेरणी भाव-नादी सुरेख .

असावे असे भय आठवांचे किती
उसासे जसे खळखळावी नदी
नसे शुन्य ते शुन्य झाले कधीचे
उरे संपुटी आसवांची सुरेख.

किती गुंतलो वेदनेच्या निखारी,
मिळाले किती मी सलांचा भिकारी
जळालो किती जळतांना उराशी
अशी वेदना वेदनांची सुरेख!

 -भूराम (३/२६/२०१६)