रविवार, ८ डिसेंबर, २०१३

मला हे विश्व व्यापते!

सदैव तू मनात गं
का नादते ऋणादते ?
परांतरातल्या तिरी
सदैव विश्व मागते.

असंख्य मी नभातळी
सभोव छान मांडतो.
तू येतसे खुळी हसे
आणि उगाच भांडते.

तू रात्र वैभवातली
व्यापते सदा कदा
होवू दे मला तुझा
तो श्वास देह एकदा.

तू जाणते अजाणता
विखुरण्या मला स्वःता
स्पष्ट जाणिवा तुझ्या
कश्या सुरात बांधते.

ही सांज पाखरी उन्हे
जळातली टिपायची 
भाव मोहिनी तुझी
ही स्पंद गीत व्हायची.

असेच हे  घडे सदा,
हा स्पंद स्पंद वेगता 
तुला असेल खेळ हा
मला हे विश्व व्यापते!

-भूराम
12/8/2013

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

वेदना स्पंदांची

रत्नांगी, मनसुधा, वेदना स्पंदांची
अर्धांगी, संस्कृती, मोहत्या गंधांची.

आकाशी 'कोहतो', पाहतो भवती मी
रातीचा देह तो, काजळी द्रवतो मी.

मोकळे श्वास हे वेचती अवनीला
चांद ही बिल्वरी, होतसे किलकिला .

गारवा पदरीचा उब मागे जशी
सोहळा पाहुनी पापणी जागे तशी .

नाद वेडा कसा जान्हवी वेग हा  
लाजरा साजरा लाघवी मेघ हा .

होवू दे साजरे जीवनाचे ऋतू 
आज ह्या वैखरी शब्द झालीस तू.  

-भूराम
१०/१९/२०१३

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

** मदारी **


घन बांधतो उद्याशी आकाश संभ्रमाचे
जगण्यातल्या धुळीचे आकांत मोह माझे.

अंधार श्वापदांचा हा भोवतीस आहे
स्पर्शातल्या रतींचा तो रोज भास आहे.

रक्तात कोसळावे गंधाळती इशारे
ऋण बांधता क्षणांशी आवेशती निखारे. 

पाऊस पावलांना, सृष्टीतल्या चरांना
अवनीस कडाड तो अन तेज अंकुरांना

मी पाहतो वयाचे हे नित्य नृत्य आहे
कधी वाहतो, कधी मी, पेटतोच आहे!

हे संभ्रमी नसे का? तू सांग यौवनारे
त्या चांदण्याच आहे कि दुःख स्पंदनारे?  

स्पन्दाताल्या युगाशी हो व्यक्त तू आता रे !
विस्तारता घडीला मी मुक्त तू आता रे!

जाणुन आज घे तू, ह्या भावना दुधारी
अन दे छेद त्या रूढींना होय तूच तो मदारी.

-भूराम
(१०/१३/२०१३)

गुरुवार, २३ मे, २०१३

तू नसतांना …


जेव्हा कुणीच माझं नसत तेव्हा तू दिसावी
पावलागणिक स्नायुना बळ देणारी.
जेव्हा कुणीच माझं नसत तेव्हा तू असावी
आभाळ घेवून जगण्यातला आर्तनाद होणारी.
जेव्हा कुणीच माझं नसत तेव्हा तू हसावी
आत्मानंदी स्पंदाचि गुपित जाणणारी.

सध्या हे फारच अपेक्षांचं ओझ आहे,
मैत्रीच्या वाटेवर चालतांना.
न उलगडणार्या अनेक क्षणांना,
आठवणींच रूप देतांना
आणि तू नसतांना …

-भूराम

शनिवार, ६ एप्रिल, २०१३

***कोसळतो शिव***


-जाणिव*
कातळाचा देह ,
रंध्र जाणिवेतो मोह
कोसळतो शिव...
स्पर्श परिसी पल्लव.
वेढणार कोण ?
वेगळेच मौन ,
निराशेच्या कुंपणाला
भेदणारे गौण.

-नेणिव*
अनावी तो, निनावी तो
'जड' असा खुणावितो
पाकळिच्या देह गती
अवनीला ऋणावीतो.
नाद होतो, साद देतो 
भय कुठे वेदना तो 
स्पंद ओंकारी असा तो
व्योम व्योम साधना तो.

-वास्तव*
घरंगळे तिच काया
त्याच रंध्री, तीच माया,
शुन्य संभवात येते
प्राण कुंठुनी जगाया.
वेच आता मोजकेच
जे तुझे ते तिथेच
शिव तुझा, तू  शिवाचा 
वास्तवाशी एक  हेच.

 -भूराम
(४/६/२०१३)

शुक्रवार, १ मार्च, २०१३

**इशारा**


परागी उन्हाचा निखारा म्हणु कि
तुझा चांद देही इशारा म्हणू मी
जसे स्पर्श होता अकारी नभाचा
तुझ्या रोम रोमी पसारा जणु मी

निळे पाश झाले डोळे पाखरांचे
आणि त्रास झाले पहारे फुलांचे
अनादिच होतो ओघ चाहुलांचा
जसे प्राण जाता नकारी सलांचे

अहंकार नाही खुल्या त्या बटांना
मला बांधणारया तुझ्या पापण्यांना
कसा सांग होवू तुझा श्वास देही
कसा नाद देवू तुझ्या स्पंदनांना.

-भूराम
३/१/२०१३

रविवार, १३ जानेवारी, २०१३

**सजा**

पराग धुळ की संदर्भांचे चंद्र किनारे,
देह पतित हां मनात उठती शुन्य इशारे
माझ्यासाठी मोह असे रे सजा कोरडी
उगाच का मी स्वतः भोवती असा ओरडी!

वेचू का पण माझे मजला अर्थ नसे रे
भेटे जोही आता मजला स्वार्थ दिसे रे
नाद नको मज दुख्खातील त्या सुखाचाही
गोंजारुनी फ़ुरफ़ुराव्या त्या पंखांचाही.

धाप लागते स्वप्नांचीही आता हो रे!
ओळ पेलत्या नक्षत्रांची मला नको रे.
सजाच आहे आता अवघे असणे नसणे.
सृजनाचा तो मोह सोहळा आता न रुचणे.

-भूराम
१/१३/२०१३