शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

तो 'घन'- मी 'मन'.

तो मन धुक्याच्यावेळी
स्निग्ध चांदणी झाला.
क्षण आवरता आवरता
तो किती लाघवी आला.

घन-अंधारातून त्याच्या
विश्वात मी कोसळलो.
व्रण थेंब थेंब वाळूचा
कोरडा शोषूनी व्यालो.

मी निळ निळ माथ्याची
ती अशी उधळून देतो.
डोळ्यात, पापणी काठा
तो तसाच बिलगूनी येतो.

मी उठतो पाण्यावरती
तरंग जणू घन-भारी
तो हिरव्या वाटेवरला
प्रवास होई जरतारी.

मी रंग रंग आवराता,
देहात गलथून जातो
तो थेंब थेंब सावरता
ओलावा कलथून देतो.

मी मोह मोह यात्रीचा
वाटेस उलथून देतो.
तो स्नेह स्नेह धात्रीचा
ह्रुदयात उमटून जातो.

ही गर्द धुक्याची वेळ
हां श्वास कोंड़ता वारा
तो घन दाटता भोवती
नयनात मोकळ्या धारा.

तो घन दाटता भोवती
नयनात मुक्तल्या धारा...

-भूराम
०८/२८/०९

सोमवार, १७ ऑगस्ट, २००९

माझ्या जन्माची कहाणी!

आभाळ गांजलेला धूर
निळ्या देहाचा काहूर
चंद्र चांदणी खुशाल
नाही काळजात सुर...

खोल दिठीचा ऊकार
श्वास श्वासांचा निखार
पाय सावलीत गेला
झाला ओसाड तो पार...

माझ्या जन्माची कहाणी
बघ किती केविलवाणी
देह मातीत लोळता
नाळ कापाया ना कोणी...
नाळ कापाया ना कोणी....

-भुराम
८/१५/२००९

बुधवार, १२ ऑगस्ट, २००९

आडोश्यातील घनदिवे.

निरवत,...
सुख आले मनात माझ्या,
गर्द दुःखाची जळमटे घेवून
की आकाशातील प्रश्न खुणांना
चंद्र-चांदणी गोंदण देवून?

मी पहा सभोवती शांत संयमी
निरखू लागलो विश्व पसारा.
आडोश्यातील घनदिव्यांना
अजून नव्हता आर्त निवारा!

फुलवत,...
क्षणास आता मनात माझ्या,
गत दुःखाचा प्रवास होवून.
वाटेवरती लांबते सावली
डोळ्यात माझ्या पहाट देवून.

मी वाट चालतो शांत संयमी
वेचून घेतो विश्व धुराळा.
आडोश्यातील घनदिव्यांना
अजून नव्हता आर्त जिव्हाळा!

आडोश्यातील घनदिवे ती
दुःखी, संभ्रमी, अबोल होती.
येतेय सुख ते क्षितीजावरती
मनात मात्र कलकल होती.
...
येतेय सुख ते क्षितीजावरती
मनात मात्र कलकल होती.

-भूराम 8/12/2009

शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

दुःख चांदणी तू गं

ते दुःख चांदणी तू गं
देहाशी ओजस वाही.
निर्वात निळीशी माया
तो चंद्र तुझा ना होई.

घनदाट फुलांचा वास
गंधात घुसळतो वारा
गर्तेत मांडता तिने
वचनांचा व्यर्थ पसारा.

आवेग तुझा ओघवता
नयनात अडकतो थेंब
रवरव मनाची आत
अन विरून जाते बोंब

ते दुःख चांदणी तू गं
आता अलगद आहे.
किरणांच्या निमिष प्रवासी
जळे तो कागद आहे.
....
किरणांच्या निमिष प्रवासी
जळतो का 'गद' आहे?

-भूराम
२००९-०८-०६

रविवार, २ ऑगस्ट, २००९

देना प्रियकर साद


(सकाळची वर्दळ नसलेली वेळ, बागेत मोर्निग वाक घेतांना फ़ुल वेचणारी सुंदर ललना दिसते आणि ही कविता जन्मते)

तुझ्या प्रितीची अबोल मजला देना प्रियकर साद.
उमलत्या क्षितीजाला देना तव नयनातील माद.

तो वारा, खोडकर येतो, छेडून, हळूच तुझ्या केसांना
मारून गिरकी, मजभोवती, म्हणे, ’पहा कळी खुलतांना’
असाच तरळत जातो त्यासव, कसा घालू गं वाद?

ती लहरे ओढणी, कशी अवखळ, तुझी सखी जिवलग,
टोचून कोपर, चुकवून नजर, म्हणे, ’तो आलाय बघ’.
उगाच आवरून घेते तिजला, करीत चुड्यांचा नाद!

ती पहा बघीची कळी, पालवी, कशी खेळती आज,
ते धुंद बिलगणे, कानी बोलणे, नसे तयांना लाज.
कशास भीते, मी तर मागे, तो नयनी संवाद.

परडी हाती, पहा फ़ुले ती, आत्ताच तू वेचली,
झुकवोनी नजरा मुग्ध उभी का? म्हणून तुजवर रुसली.
कसा कळेना अजून तुजला त्यांचा तो हळवाद.

एकांत असा हा पळपळे, जाईल लगेच गं हरवून,
शांत रस्ता, पहा कसा तो, जाईल मग गजबजून!
कशास झुरणे, नंतर दोघे कर आत्ताच हा प्रमाद!

तुझ्या प्रितीची अबोल मजला देना प्रियकर साद.
उमलत्या क्षितीजाला देना तव नयनातील माद.

-भूराम (२६/१२/२००१)