माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या प्रयत्नात कविता माझ्या सोबतीला आली.... त्या सोबतीत फुललेल्या काही क्षणांची ही एक पुसटशी नोंद.... (तुमचे अभिप्राय जरूर नोंदवा...)
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०
!! श्वास उखाणे !!
मज आठवण होते
काळीज तुझे जळतांना
प्रहरांच्या रडत्या वेळी
डोळी तुझ्या खळतांना.
थांबु दे जरा बैरागी
जगू दे हा माणूस थोडा
नक्षत्रांतही असतो त्याचा
धनुष्य रोखता घोडा
नसे रंग रक्त जळणारे
नसे व्यक्त सर्व कळणारे
घे आयुष्याच्या अवधी
जेही फक्त फक्त पळणारे
मज आठवण होते
अंधाराशी ह्या भिडतांना
प्रहरांच्या लढत्या काळी
आयुष्य दिसे खुडतांना.
व्याधीच जडे मरणाची
जगण्याचे करुनी बहाणे
सारवुनी घेवूदे आता
श्वासांचे श्वास उखाणे.
-भूराम
चांद
चांद देखण्या मनाचा
छान गोजिरा दिसेतो
प्राण पांघरुन राती
कसा चोरटा हसे तो
त्याला ठाउकसे आहे
माझे साजण गुपित
डोळा उतरुनी माझ्या
स्वप्न जागणारे देतो.
गड्या साथ तुझी मला
मन कळे फक्त तुला
देते पदराला गाठ
तुचं आठवणं होतो.
चांद देखण्या मनाचा
जग रोज माझ्या देही
दूर सावध सिमेला
जरी दिसणारं नाही.
-भूराम
मनभर
मनभर क्षणभर
चांद देखणा धिवर
तोच आभाळी रेखतो
छान चांदणी मखरं.
भर भोवताली ऋचा
स्नेह स्नेहावली त्वचा
त्या काळीजी वदाला
पेलं सावध अधरं.
थांब थांबलेलं जगं
घडे निसर्गाचा वगं
गळे भोवताली आता
अहं मानवी पदरं.
मनभरं क्षणभरं
ऋणझुणते शहरं
ह्या मरणं मिठीला
काळं बिलगला खरं.
बांध बंधन स्व:ताचे
साह एकांताचे टोचे
देत उद्याच्या उन्हाला
आज जागता प्रहरं.
-भूराम
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)