शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

दत्ततत्वच

आत्मे प्रकाश होती ,
स्पंदे वेगात होती
ओघळ मन्मतीतील 
हरखून जणू सभोवात होती
बंधने सारी तुटलेली
मी तू दुरी मिटलेली. 
दुःखे विरली, बोथटलेली
अनुभूतीच ही सभोवात होती
क्षणाचाच होता तो सारा खेळ
ओढ ज्याची जिवापेक्षा गोड
रिते आणि मुक्त पूर्णत्वच हे 
दत्ततत्वच ही सभोवात होती.

-भुराम

गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

|| पूर्णत्वाची रात ||

मौनें मनात आहे
आत्मे सुरात आहे
आकाश तत्वे नूरावी
अशी स्पंद रात आहे

ते मोकळेच जळणे
उष्ण श्वासे घळणे
अग्नी तत्वे नूरावी
अश्या मिठीत रात आहे

डोळ्यास डोळा कळावा
आसवांनी तो ओघळावा
जल तत्वे नूरावी
अशी तरल कात आहे

गंध मुग्ध दरवळता व्यक्त
ना तुझा ना माझा फक्त
वायू तत्वे नूरावी
अश्या क्षणी क्षणात आहे

अधरा धरे ना धरती
धरती ना कळे शरीर ती
पृथ्वी तत्वे नूरावी
जडत्वें ना अता ज्ञात आहे

पंचतत्वे न उरले काही
जिव शिवातुनी हा प्रवाही
पुर्ण तत्वातूनी उरावी
पूर्णत्वाची अशी रात आहे.

-भुराम
१२/२०/२०१८

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

।।आभाळ।।

तिथंही आठवण होती आणि इथंही
आभाळाला ये म्हटलं तर म्हणाला,
“नको तुझ्या प्रत्येक
शब्दात
खुप चमका निघतात
काळजात
भारलेल्या नजरेत
गारठून येते फार
जवळ आलो तर
गडगडायला होतं
त्या ऱ्हदयीच्या
हर एक धडधडीने
नको मित्रा नको
तुच कोसळतो मग
मिठीत मला घेवून
लोकांना वाटतं की
मीच कोसळलोय
आणि
ही माझ्या मित्राचीच
आसवं आहेत येव्हढंही
बोलवलं जात नाही मग,
ह्या आवंढून आलेल्या
कंठाला.
नको मित्रा नको”

-भूराम