गुरुवार, १९ मार्च, २००९

!!अंत्यविधी!!


फ़ुले बांधल्या देहाची
होती अंधारली रात.
मी मोजता किनारा
धस्स झाले काळजात.

ओल्या कातळ कांतीला
निळ्या नभाची किनार.
शब्द सुरकते माझा
जीव झाला गं उदार.

रंध्र रंध्र आयुष्याचे
शोध शोधतात श्वास.
बंद पापण्यात त्याच्या
बघ दडलेली आस.

खुरे उधळलेली जात
रडे रडतात किती.
जड पावूलांना मंत्र
वाळू बिलगते माती.

खाली ढिगारा नात्यांच्या
वरी पहुडला देह
आता चेतवा ठिणगी
सारा जळू दे गं मोह.

-भूराम.
०३/१९/०९

सोमवार, २ मार्च, २००९

बहिर्या दिशेला

ओल आभाळ उदासी,
निळ्या चांदणीचा देह.
जन्म मातला मातला,
नाही उरला गं मोह.

कुण्या बांधल्या हातांनी,
रोज उधळीतो गीत.
स्पर्श जाणिवे जगतो
वेड्या अंधाराची रीत.

शब्द माउली मनात
छान जगतो सुखात
गर्द बहिर्या दिशेला
असे सांडलेली रात.

-भूराम 03/02/09

सोमवार, २९ डिसेंबर, २००८

नव्या वर्षाचे स्वागत


तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना नव वर्ष सुखाचे आणि समृध्दीचे जावो.
------------------------------------
नव्या वर्षाचे स्वागत, ओल धरते पापणी.
नवा आनंदही आहे, संगे जुन्या आठवणी.

विश्व परिस बाहूंचे दिसे विनविते चला.
जावू धावून रे करू नव्या स्नेहाची बोहणी.

उडे पाखराची जात, तिला नवे काय त्यात.
नव्या आकाशासाठीच चला करुया मागणी.

नव्या नव्याची हाउस, मान्य राहे नऊ दिस.
जुने वर्खण्याला मागू नव्या चैतन्याचे पाणी.

झाले गंगेला मिळाले, वृथा शोक काय त्याचा?
उभा राहुया रांगेत, नव्या प्रश्नांची वाटणी.

नव्या वर्षाचे स्वागत, नव्या स्वप्नांची वेचणी
नव्या उत्साहाने करू, नव्याध्येयाची आखणी.

--भूराम.