मंगळवार, २५ नोव्हेंबर, २००८

एका नगास


college ला असतांना एका मित्राच्या फ़ालतू comments वर आलेला राग मी असा व्यक्त केला होता.

गळ्यात माळून घे तू, हे सुर्य, चंद्र,तारे.
सारे काही एकच तुझ्यासाठी मुर्खारे.

हसू नकोस राज्या,... हा विनोद नाही काही.
तुझा रुबाब तो कसला, जो तुलाच वाटतो शाही.


तू जगाचा नामी अव्वल अप्पलपोटी,
कृतीत लंगडा घोडा, सदाच "मी-मी" ओठी.

तुझे दगडाचे मन, न त्याला कसला पाझर.
कुठेही टाकतो पिचक्या, सदाच आपली वरवर.

अजब तुझा तो ढंग, अजब तुझे ते रंग.
ह्या अजब दुनिये मधला अजब असे तु व्यंग

कशी रे झेलते तुला, आमची विशाल छाती,
जेही जसे तू देशील ते तसेच येईल हाती.

आहे मान्य विकण्याला येथे ओरडावेच लागते.
तरीही ह्या जिभेला पाहून उचलावे लागते.

हाताची पाचही बोटे नसतात कधीच सारखी
एकच चुकीचा शब्द माणसं होतात पारखी.

ह्या दुनियेकडे तू बघ, सावरून मनातील ढग.
तुलाच नकोसे होतील तुझ्या सारखेच नग.

--भूराम...

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

भाऊबीज

"माझी एक खुप जुनी कविता येत्या भाऊबीजेला भावाची ओवाळनी म्हणून"

परदेशातील राजकुमार येईल तुला न्याया
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

पोपटपंची सारेच करती भुलू नको कुणास,
राजपिंडा तो राजकुमार तुझा एकच खास.
डोळ्यांमधली स्वप्ने तुझी सारी साकाराया,
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

देवू नकोस लक्ष त्यांकडे ते सारेच चिवचिवती,
गरुडासारखी झेप तुझी म्हणून सारे जळती.
विंध्य, मग येईल हिमालय तरी न तू थांबाया.
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

संकट, दुःखे अनेक येतील तुझ्या वाटेस
गुलाब तोडू जाशील तेव्हा टोचतील काटेच
सक्षम तू आहेस तरीही ढळू न दे काया.
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

नसेल शरीरे पण मने सदा असेल सोबत,
पूढे चाल तो वाट पाहतो महाद्वारी ऐरावत.
समृध्दीची अथांग गंगा पायी लोळण घ्याया
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

--भूराम

रविवार, २६ ऑक्टोबर, २००८

स्मृती सावल्या.



नाहीत सावल्यांचे मी घर केले बंद,
आत्ताच सुर्य होता क्षितीजावरी मंद.
जरी रात्र येईल गिळण्या सावल्यांना
सांगून ठेवलेय विजेच्या त्या दिव्यांना.

समोर वास्तवाची चालेल वाट काळी,
स्मृती दाटून येता जाईल दिव्याखाली.
जवळता सावली छोटी, दुरता लांब होती.
अंतरे स्मरेल मजला प्रत्येक घडीचा साथी.

ह्या इथेच तो भेटला, इथे जवळचा झाला.
इथेच कोण कसा तो क्षणात रे दुरावला.
इथेच कुस मायेची कुणाची रे मिळाली.
इथेच कुणाला माझी नको होती सावली.

हो इथे सारी आली माझ्या पाऊलाखाली
इथेच हासू झालो मी कुणाच्या गाली.
इथे मी हळवा झालो अन इथे बोलका झालो.
इथेच सौदर्य मनातील कसा ओतता झालो!

इथे दिशेचे भान कसे मला मिळाले,
इथेच कुणाशी छान जुळवून घेता आले.
इथेच सावली काही थरथरलीही होती,
इथेच कशी ती गर्द मोहरलीही होती!

अशीच बदलून अंतरे दिव्यापासून माझी
मोजत राहील उंची स्मृती सावल्यांची.
उगाच मांडून गणिते चुका अन क्षमांची
पुढेच चाललो वाट स्वप्न, ध्येय-दिशांची.

--भूराम.