मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

भाऊबीज

"माझी एक खुप जुनी कविता येत्या भाऊबीजेला भावाची ओवाळनी म्हणून"

परदेशातील राजकुमार येईल तुला न्याया
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

पोपटपंची सारेच करती भुलू नको कुणास,
राजपिंडा तो राजकुमार तुझा एकच खास.
डोळ्यांमधली स्वप्ने तुझी सारी साकाराया,
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

देवू नकोस लक्ष त्यांकडे ते सारेच चिवचिवती,
गरुडासारखी झेप तुझी म्हणून सारे जळती.
विंध्य, मग येईल हिमालय तरी न तू थांबाया.
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

संकट, दुःखे अनेक येतील तुझ्या वाटेस
गुलाब तोडू जाशील तेव्हा टोचतील काटेच
सक्षम तू आहेस तरीही ढळू न दे काया.
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

नसेल शरीरे पण मने सदा असेल सोबत,
पूढे चाल तो वाट पाहतो महाद्वारी ऐरावत.
समृध्दीची अथांग गंगा पायी लोळण घ्याया
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

--भूराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा