शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

मळभ

मन मनाला भारते
मन भरते का नाही
भर भारल्या क्षणांना
झोळी फाटणार नाही
कधी काळीजाचा ठोका
कधी ठोक्यात काळजी
धडधड काही होते
काही बोलते का नाही.
जाण जाणिवांचे जग
झड झडू दे मळभ
डोळा पापणीशी येते
मौन थेंब थेंब काही.
ओला श्वास उन्हाळतो
पारिजात हा गळतो
घेता अलवार हाती
नाव ओठांवर राही.

-भूराम

मनं


मन मनाच्या मार्गी
ते थांबले का नाही
चाल चालते पुढे ते
मागे उरले का नाही?
देत उद्याच्या मिठीला
भोग, क्रिया आणि कर्म
साक साकळूनी वृत्ती
कधी हरले का नाही?
मन मनाच्या मार्गी
कुठे पोहचेल सांग
घडे धावत्या गतीला
नाही लागेना रे थांग
देत उद्याच्या पिढीला
उभ्या प्रवासाचे सातू
सत्व त्याचे काळजाला
कुणी भरले का नाही!
मन मनाच्या मार्गी
काढे जगाची ह्या खोडी
मस्तवाल जगण्यात
नसे लाज त्याला थोडी
देत उद्याच्या पिढीला
आत्ममग्नी आनंद तो
गुढ त्याचे का कुणाला
कधी कळले का नाही?
मन भरतो माझे मी
मन पेरतो माझे मी
का मी आवरु तयाला
ज्या थीटा दिशा दाही!

-भूराम

सेलिब्रेट

आजचा दिवस आम्हाला सेलिब्रेट करू दे
आमच्या मनी हाच क्षण चेकमेट करू दे
विदेशी ती चाॅकलेट विदेशी तो टेडी
बायकोला बघ देतांना किती होते वेडी
गोड हासू चेहऱ्यावरचं नको हेट करू ते
आजचा दिवस आम्हाला सेलिब्रेट करू दे
संस्कृतीचं ह्या कौतूक खूप आहे पोरी
मेरा भारत मेरी जान दोन्ही मला प्यारी
भारतामध्येच माझं दिल तिला भेट करू दे
आजचा दिवस आम्हाला सेलिब्रेट करू दे
राम आणि पांडवांना आठव जरा थोडं
बायको साठीच युध्दात मेलं हत्ती घोडं
रोजचंच मरणं आमचं फक्त आज डेट करू दे
आजचा दिवस आम्हाला सेलिब्रेट करू दे
-भूराम