शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

मळभ

मन मनाला भारते
मन भरते का नाही
भर भारल्या क्षणांना
झोळी फाटणार नाही
कधी काळीजाचा ठोका
कधी ठोक्यात काळजी
धडधड काही होते
काही बोलते का नाही.
जाण जाणिवांचे जग
झड झडू दे मळभ
डोळा पापणीशी येते
मौन थेंब थेंब काही.
ओला श्वास उन्हाळतो
पारिजात हा गळतो
घेता अलवार हाती
नाव ओठांवर राही.

-भूराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा