माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या प्रयत्नात कविता माझ्या सोबतीला आली.... त्या सोबतीत फुललेल्या काही क्षणांची ही एक पुसटशी नोंद.... (तुमचे अभिप्राय जरूर नोंदवा...)
रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३
** मदारी **
घन बांधतो उद्याशी आकाश संभ्रमाचे
जगण्यातल्या धुळीचे आकांत मोह माझे.
अंधार श्वापदांचा हा भोवतीस आहे
स्पर्शातल्या रतींचा तो रोज भास आहे.
रक्तात कोसळावे गंधाळती इशारे
ऋण बांधता क्षणांशी आवेशती निखारे.
पाऊस पावलांना, सृष्टीतल्या चरांना
अवनीस कडाड तो अन तेज अंकुरांना
मी पाहतो वयाचे हे नित्य नृत्य आहे
कधी वाहतो, कधी मी, पेटतोच आहे!
हे संभ्रमी नसे का? तू सांग यौवनारे
त्या चांदण्याच आहे कि दुःख स्पंदनारे?
स्पन्दाताल्या युगाशी हो व्यक्त तू आता रे !
विस्तारता घडीला मी मुक्त तू आता रे!
जाणुन आज घे तू, ह्या भावना दुधारी
अन दे छेद त्या रूढींना होय तूच तो मदारी.
-भूराम
(१०/१३/२०१३)
गुरुवार, २३ मे, २०१३
तू नसतांना …
जेव्हा कुणीच माझं नसत तेव्हा तू दिसावी
पावलागणिक स्नायुना बळ देणारी.
जेव्हा कुणीच माझं नसत तेव्हा तू असावी
आभाळ घेवून जगण्यातला आर्तनाद होणारी.
जेव्हा कुणीच माझं नसत तेव्हा तू हसावी
आत्मानंदी स्पंदाचि गुपित जाणणारी.
सध्या हे फारच अपेक्षांचं ओझ आहे,
मैत्रीच्या वाटेवर चालतांना.
न उलगडणार्या अनेक क्षणांना,
आठवणींच रूप देतांना
आणि तू नसतांना …
-भूराम
शनिवार, ६ एप्रिल, २०१३
***कोसळतो शिव***
-जाणिव*
कातळाचा देह ,
रंध्र जाणिवेतो मोह
कोसळतो शिव...
स्पर्श परिसी पल्लव.
वेढणार कोण ?
वेगळेच मौन ,
निराशेच्या कुंपणाला
भेदणारे गौण.
-नेणिव*
अनावी तो, निनावी तो
'जड' असा खुणावितो
पाकळिच्या देह गती
अवनीला ऋणावीतो.
नाद होतो, साद देतो
भय कुठे वेदना तो
स्पंद ओंकारी असा तो
व्योम व्योम साधना तो.
-वास्तव*
घरंगळे तिच काया
त्याच रंध्री, तीच माया,
शुन्य संभवात येते
प्राण कुंठुनी जगाया.
वेच आता मोजकेच
जे तुझे ते तिथेच
शिव तुझा, तू शिवाचा
वास्तवाशी एक हेच.
-भूराम
(४/६/२०१३)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)