रविवार, १३ जानेवारी, २०१३

**सजा**

पराग धुळ की संदर्भांचे चंद्र किनारे,
देह पतित हां मनात उठती शुन्य इशारे
माझ्यासाठी मोह असे रे सजा कोरडी
उगाच का मी स्वतः भोवती असा ओरडी!

वेचू का पण माझे मजला अर्थ नसे रे
भेटे जोही आता मजला स्वार्थ दिसे रे
नाद नको मज दुख्खातील त्या सुखाचाही
गोंजारुनी फ़ुरफ़ुराव्या त्या पंखांचाही.

धाप लागते स्वप्नांचीही आता हो रे!
ओळ पेलत्या नक्षत्रांची मला नको रे.
सजाच आहे आता अवघे असणे नसणे.
सृजनाचा तो मोह सोहळा आता न रुचणे.

-भूराम
१/१३/२०१३

रविवार, १६ डिसेंबर, २०१२

||जगणे आहे||

ओंजळीतले घरटे तुटले,
काज निळेशे काहूर फुटले
जखमांची ती खपली त्यावर
आसवेच ही, चरचर रुतले.

कोण म्हणावा दिडदा आणि
की गंजलेली खरखर म्यांनी.
नाद कळेना कुठला आहे,
जीवन गाणे असेच म्हटले.

आज काहीसे थांबून बघतो,
ते गेलेले वैभव जगतो,
त्या तुटल्या घरट्यावर मग
किती श्वास बघ असेच सुटले.

सार बाजूला जगणे आहे.
सुर्य उद्याचा बघणे आहे.
गेली नाही उमेद अजुनी.
झोप आता तू डोळे मिटले.
...
ओंजळीतले घरटे तुटले....

-भूराम
12/16/2012

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२

भोई

रानधुळीचा साजण
साद घालितो एकाकी
त्याच्या सभोवाला होती
सांज प्रेमाची लकाकी.

प्राण पांघरून येते,
चांद नदीची किनार.
त्यात भिजलेला होतो
त्याच्या डोळ्यातील पार.

दूर देखणे शिवाचे
दिसे एकले देऊळ
देह थकलेला त्याचा
वाट झालेली गढूळ.

चालताना गुणगुणे तो
गाणे पालखीचे गोड.
दूर झालेले कितीक
मना सोबतीला ओढ.
...
गाणे पालखीचे गोड,
मना सोबतीला ओढ.

-भूराम
१२/१४/२०१२