शनिवार, १ जानेवारी, २०११

संभ्रमी

काळ रेटतो, वाटा नाही
थांबलो मी पण, लाटा नाही.
आडोश्याला आहे जी बघ
भिंत एकटी, विटा नाही.

असेच असते दुःखांचे जग
अनेक दुःखी माझे ही मग,
एकटा मी तर सदाच वाटे
दुःख एकटे? कधीच नाही.

प्रयत्नातूनि प्रयत्न करतो
गरज संपता शोध ही सरतो
गरज खरीतर तशीच असते
देहच नश्वर इलाज नाहि!

किती मिळाले! प्राक्तन रडतो,
आज रेटला, उद्यास भीडतो
आज उद्याचे नातेच फ़सवे
उद्यास भीडता आजच होई.

नसे संभ्रमी याहून काही
दुःख असे हे सलत राही.
सवयिचे मग होते जगणे
रुते वेदना, काटा नाहि.

-भुराम
(01/01/2011)

शनिवार, १ मे, २०१०

विश्व परिघात मला, घडणेच आहे

जगण्यास आलो,
जगणेच आहे.
पडता नदीत
मला पोहणेच आहे.

कोण म्हणे मला,
हा नाही रे प्रवास,
उठले पाउल पुढे
चालणेच आहे.

वेळ येता जैसी, तैसे
भिडणे लढणे.
थांबणे ना कधी,
नाहीच रडणे.

हार-जीत काय?
रोजचाच खेळ!
विश्व परिघात मला,
घडणेच आहे.

-भूराम
05.01.2010

बुधवार, २१ एप्रिल, २०१०

अंगाई

आकार उकार,
झाला जाणीवेचा भार
परीघ केव्हढे,
त्यात धावपळ फार
पावूल पडती,
चंद्र सावल्यांना गती
आता उगवला कोण
बघताच गेला माती!

निखर प्रखर
धुळीतला एक कण
चांदण पेरे तो,
ओवाळू दे लिंबलोण,
पापणकडेला
मग चमकला आसू
भोवती धुराळा
तरी दिसतेय हासू!

काय ते मनाचे
खेळ संचिताचे
भोवती धुराळा
आणि भार जाणिवेचे.
"ओंजळीत राज्यां
तुझ्या आयुष्य वाहते",
धीर देते 'माया'
आणि निज डोळा येते.

-भूराम
०४/२०/२०१०