शुक्रवार, २५ डिसेंबर, २००९

विश्व संमोही

गहिवर हिरवा ,
मनी मारवा,
थर थर ओठी
स्निग्ध गारवा.

स्वप्नच ओले
ठेवणीतले,
गर्द नभाशी
उडे पारवा.

नितळ प्रकाशी
जगे उदासी
मलमलीत हे
दुःखच झुलवा.

उलला देह
पडला मोह
विश्व संमोही
खुलवा भुलवा.

-भुराम
[१२/२४/२००९]

गुरुवार, २४ डिसेंबर, २००९

निळसर होती नदी ...

निळसर होती नदी
आभाळ घेवून जगणारी
त्या कोसळत्या सरींसंगे
विमुक्त ढगात उधळणारी....
निळसर होती नदी ...

कळल नाही दुःख तीच
दिसली नाही आसवं,
भावनांचा तो प्रपात,
आठवणींची कासवं...
येता जाता वाटसरूच्या
पावूलात विनये घोटाळणारी
निळसर होती नदी ...
आभाळ होवून जगणारी..

आला खडक, दिली धडक,
कधी ओले डोळे भडक,
गर गर गिरकी, फ़िर फ़िर फ़िरकी,
भोवर्यात येता ओढणारी
निळसर होती नदी ...
आभाळ होवून जगणारी...

आता नाहि गेली कुठे,
दिसे तेही वाटे खोटे
सुकलेल्या लव्हाळीला
लपवू पाही दगड, गोटे.
कुण्या डबक्यात दिसली आसवे!
आणि मासळी तडफडणारी!
निळसर होती नदी ...
आभाळ होवून जगणारी..
निळसर होती नदी ...
आभाळ होवून जगणारी..

-भुराम.
१२/२४/२००९

रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

उषःकाल होता होता!

धरतीच्या आत उदासी
तो माणूस उगवित होता.
प्रहराशी प्राण निमुळता
देहास भोगवीत होता.

नियतीशी कोण विखुरला!
तो हरला आणिक सरला!
जगणारा श्वास उद्याशी
आक्रोश बडवीत होता.

रंगाशी निपजला तारा
नयनात गोंदाल्या धारा
घरट्यात चिमुकली चोच
पंखास खरडीत होता.

ती उठली आई माथी
शेणाची टोपली होती.
खपली खपली धरती
सारवून घे गं आता.

धरतीच्या आत उदासी
तो माणूस, उगवित होता.
उषःकाल होता होता!
सारवून घे गं आता.

-भूराम
१०/२४/२००९