शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

दुःख चांदणी तू गं

ते दुःख चांदणी तू गं
देहाशी ओजस वाही.
निर्वात निळीशी माया
तो चंद्र तुझा ना होई.

घनदाट फुलांचा वास
गंधात घुसळतो वारा
गर्तेत मांडता तिने
वचनांचा व्यर्थ पसारा.

आवेग तुझा ओघवता
नयनात अडकतो थेंब
रवरव मनाची आत
अन विरून जाते बोंब

ते दुःख चांदणी तू गं
आता अलगद आहे.
किरणांच्या निमिष प्रवासी
जळे तो कागद आहे.
....
किरणांच्या निमिष प्रवासी
जळतो का 'गद' आहे?

-भूराम
२००९-०८-०६

रविवार, २ ऑगस्ट, २००९

देना प्रियकर साद


(सकाळची वर्दळ नसलेली वेळ, बागेत मोर्निग वाक घेतांना फ़ुल वेचणारी सुंदर ललना दिसते आणि ही कविता जन्मते)

तुझ्या प्रितीची अबोल मजला देना प्रियकर साद.
उमलत्या क्षितीजाला देना तव नयनातील माद.

तो वारा, खोडकर येतो, छेडून, हळूच तुझ्या केसांना
मारून गिरकी, मजभोवती, म्हणे, ’पहा कळी खुलतांना’
असाच तरळत जातो त्यासव, कसा घालू गं वाद?

ती लहरे ओढणी, कशी अवखळ, तुझी सखी जिवलग,
टोचून कोपर, चुकवून नजर, म्हणे, ’तो आलाय बघ’.
उगाच आवरून घेते तिजला, करीत चुड्यांचा नाद!

ती पहा बघीची कळी, पालवी, कशी खेळती आज,
ते धुंद बिलगणे, कानी बोलणे, नसे तयांना लाज.
कशास भीते, मी तर मागे, तो नयनी संवाद.

परडी हाती, पहा फ़ुले ती, आत्ताच तू वेचली,
झुकवोनी नजरा मुग्ध उभी का? म्हणून तुजवर रुसली.
कसा कळेना अजून तुजला त्यांचा तो हळवाद.

एकांत असा हा पळपळे, जाईल लगेच गं हरवून,
शांत रस्ता, पहा कसा तो, जाईल मग गजबजून!
कशास झुरणे, नंतर दोघे कर आत्ताच हा प्रमाद!

तुझ्या प्रितीची अबोल मजला देना प्रियकर साद.
उमलत्या क्षितीजाला देना तव नयनातील माद.

-भूराम (२६/१२/२००१)

सोमवार, २७ जुलै, २००९

विसरावे दुःख आता, त्यात काय नवे!

विसरावे दुःख आता, त्यात काय नवे!!
फ़ेकलेल्या दगडाने विखुरावे थवे॥

परसात फ़ुल आहे त्याचे ते एकाकी
रंग त्याचा, गंध त्याचा, त्याची ती लकाकी
भुंगा कोण? वारा बघ त्याचा तो झुलवे
विसरावे दुःख आता, त्यात काय नवे!!

दारात ह्या पणतीला पाकोळी बिलगे
पंख गाळी, देह जाळी हाय कैसी जगे!
पणतीला काय त्यात, तीची ती मालवे.
विसरावे दुःख आता, त्यात काय नवे!!

रंग कुंचल्यांचे जग विखुरते सुख.
फ़टकारे कागदाला हरवे ओळख.
कोण विचारी कुणाला चालायाचे सवे
विसरावे दुःख आता, त्यात काय नवे!!

ओल्या ओल्या मातीत या रूजे तेच बीज
देहाच्या ह्या आडोश्याला येते तीच नीज
रोजचेच स्वप्न आणि त्याचे चे फ़सवे!
विसरावे दुःख आता, त्यात काय नवे!!

नवे काय त्यात सांग, जो तो त्याच्या वाही
श्वास त्याचा तो गतीत वेळ न त्यालाही
दुःख तेच रोजचेच का मी आठवावे?
विसरावे दुःख आता, त्यात काय नवे!!
फ़ेकलेल्या दगडाने विखुरावे थवे॥

--भूराम
७/२७/२००९ १२:२८AM