रविवार, १४ जून, २००९

नियती गं शांत हो तू..

"शोध चिंगारिचा - कवि नाम" वाचून स्फ़ुरलेली कविता

नियती गं शांत हो तू नेणत्या विश्व राती
तु कथा असे सुरांची जाणती मोह माती...

गुरफ़टले अनेक आहे देहातले किनारे
पाउस मोजतांना थेंबांशी चळवळ्णारे
आक्रोश हा कधीचा अस्वस्थ होय हाती
नियती गं शांत हो तू नेणत्या विश्व राती

बांधून ठेवलेले जन्मातले ते उखाणे
जाणून आज घेतो नियतीशी काय घेणे?
चाहूल ती उद्याची नव्हतीच ह्या ललाटी
नियती गं शांत हो तू नेणत्या विश्व राती

काजवे अता उडावे चमकून क्षण काही
पावूले अता पडावे दचकून प्राण होई?
आश्वस्थ मी कधीतर वेदना असे मना ती
नियती गं शांत हो तू नेणत्या विश्व राती

काहूर माजलेले उरात सैर भैर
जिव्हेतळी फ़ुटावी मौनातली अखेर
गुंता असे मनाशी, न गुंतेतली प्रभा ती
नियती गं शांत हो तू नेणत्या विश्व राती.
तु कथा असे सुरांची जाणती मोह माती...

-भूराम

सोमवार, ८ जून, २००९

काहुर


सांजल्या जगाशी उधळला वारा.
गार गार, मंद मंद अंगाला शहारा.

हळूच चकाके बघ धूळ पावूलात.
तुळशीच्या पायी दिसे जळणारी वात.

चाहुली चाहुली एक निशिगंध येई
त्या सभोवास गंध, आणि कुणी नाही

थकलेली तुडवूनी देश प्रांत प्रांत
घरट्यात परतली पाखरे ही शांत

धरती गं सभोवती दिसे ती एकाकी.
रात किड्या किर किर त्याचा तोच भाकी.

दाटले दाट्ले आता उरात काहूर.
चांदण्या बांधल्या दिसे आकाशात दूर.

सरला मनाशी माझ्या कोंडलेला दिस
कुणी पदरात वेडा सांडला पाउस?

-भुराम
६/७/२००९

रविवार, ३१ मे, २००९

वादळता ध्यास

गड झाला जड
त्यात उगवला वड
निळा निळा मोती
त्याच्या निळाईची झळ.

परिस परिस,
असे स्पर्श माझे दिस.
सरले सरले,
गेले वर्ष साजे तीस!

आभाळाला घाई
त्याच्या पांगुळगाड्यालाही
गडद गडद ,
त्याच्या डोळ्यांमधे आई!

आधार उधार,
झाला विश्वाचा बाजार
उधळली माती,
तिने झेलता गं वार?

उपाशी तपाशी
माझ्या नजरेत काशी
जिथे रोज गंगा
असे गढूळ प्रवासी.

आकाश कोंडले
आणि कोंडला गं श्वास.
परतीच्या वाटा
आणि वादळता ध्यास.

-भूराम
३१ मे २००९