मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

भाऊबीज

"माझी एक खुप जुनी कविता येत्या भाऊबीजेला भावाची ओवाळनी म्हणून"

परदेशातील राजकुमार येईल तुला न्याया
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

पोपटपंची सारेच करती भुलू नको कुणास,
राजपिंडा तो राजकुमार तुझा एकच खास.
डोळ्यांमधली स्वप्ने तुझी सारी साकाराया,
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

देवू नकोस लक्ष त्यांकडे ते सारेच चिवचिवती,
गरुडासारखी झेप तुझी म्हणून सारे जळती.
विंध्य, मग येईल हिमालय तरी न तू थांबाया.
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

संकट, दुःखे अनेक येतील तुझ्या वाटेस
गुलाब तोडू जाशील तेव्हा टोचतील काटेच
सक्षम तू आहेस तरीही ढळू न दे काया.
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

नसेल शरीरे पण मने सदा असेल सोबत,
पूढे चाल तो वाट पाहतो महाद्वारी ऐरावत.
समृध्दीची अथांग गंगा पायी लोळण घ्याया
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे उडाया.

--भूराम

रविवार, २६ ऑक्टोबर, २००८

स्मृती सावल्या.



नाहीत सावल्यांचे मी घर केले बंद,
आत्ताच सुर्य होता क्षितीजावरी मंद.
जरी रात्र येईल गिळण्या सावल्यांना
सांगून ठेवलेय विजेच्या त्या दिव्यांना.

समोर वास्तवाची चालेल वाट काळी,
स्मृती दाटून येता जाईल दिव्याखाली.
जवळता सावली छोटी, दुरता लांब होती.
अंतरे स्मरेल मजला प्रत्येक घडीचा साथी.

ह्या इथेच तो भेटला, इथे जवळचा झाला.
इथेच कोण कसा तो क्षणात रे दुरावला.
इथेच कुस मायेची कुणाची रे मिळाली.
इथेच कुणाला माझी नको होती सावली.

हो इथे सारी आली माझ्या पाऊलाखाली
इथेच हासू झालो मी कुणाच्या गाली.
इथे मी हळवा झालो अन इथे बोलका झालो.
इथेच सौदर्य मनातील कसा ओतता झालो!

इथे दिशेचे भान कसे मला मिळाले,
इथेच कुणाशी छान जुळवून घेता आले.
इथेच सावली काही थरथरलीही होती,
इथेच कशी ती गर्द मोहरलीही होती!

अशीच बदलून अंतरे दिव्यापासून माझी
मोजत राहील उंची स्मृती सावल्यांची.
उगाच मांडून गणिते चुका अन क्षमांची
पुढेच चाललो वाट स्वप्न, ध्येय-दिशांची.

--भूराम.

रविवार, १९ ऑक्टोबर, २००८

प्रवास


शब्द तो अनुरागे
देहातील ही परिभाषा
रे गंध, निळासा जोगी
चल नव्या खुणवती देशा.

तू पहा फ़ुलांचे वेग,
की गर्द मनाशी चाळा
आवेश बांधता भोगी
चैतन्याच्या ज्वाळा.

ह्या रणरणत्या चाहूली
ती अशी मोहीनी होते
ते रंग रंग तुटलेले
क्षितीजावर ओतूनी जाते.

घे प्राण तुझे नी माझे
आता भरोसा नाही.
ह्या पूढल्या वाटेवरती
कुठलाच आडोसा नाही.

-भूराम...
१०/१९/०८