शनिवार, ३० मे, २०२०

मृत्यू

तू तेव्हढा का रे शून्य शोधतो हा
येता मनांत सारे प्रश्न ठेवतो का?
जाणे जगा जगणे सत्य हेच आहे
मृत्यूस पाहताना फक्त हासतो का?
रक्ताविनाही जन्म होतसे इथे रे
जन्माविनाही मृत्यू होतसे इथे रे
बोध शोक त्यांचा दग्ध भासतो का?
मज वेदना कळू दे आरंभ सांडणारी
डोळ्यात ओघळू दे प्रारंभ मांडणारी
प्रारंभ हा सदा रे प्रारंभ राहतो का?
शून्यातल्या जगाने शून्यात लुप्त व्हावे
शून्यास मांडताना शून्यात व्यक्त व्हावे
शून्य कितीहा सांग शून्यात राहतो का?
बोल...
येता मनांत सारे प्रश्न ठेवतो का?

-भुराम 



शुक्रवार, २२ मे, २०२०

🌹 मना 🌹

————-
न पाहता मना तुला
तू पाहीले मनातले
न बोलता कधी कुठे
का वाचिले मनातले ?
सांडील्या दवा तुझे
ओल वेचिता कधी
आसवे कधी कसे
सांडीले डोळ्यातले.
मनोमिता नभा तिरी
ती सुर्य रेख पाखरी
आठवांनी रेखले
का स्पंद तू उरातले?
मना तुझ्या ऋणात मी
वेदना क्षणात मी
दुजा नव्हे तुझाच मी
तू जाणिले मनातले. 
-भूराम

शनिवार, १६ मे, २०२०

आव्हान

——🌸———
पेलणे आव्हान आहे
जिंकणे सम्मान आहे
घडता मी ह्या घडीला
होणे मी निर्माण आहे.
ठेवतां मी शब्द खाली
पेटती साऱ्या मशाली
शोध सोपी वाट माझी
सोडीले निशाण आहे.
जा रे सांगा ह्या जगाला
विध्द झाल्या जाणिवेला
शरपंजरी देही माझ्या
पेटलेला प्राण आहे.
मी निघालो वाट माझी
ती उद्या पहाट माझी
रोखणे नाही मला मी
उठविले रान आहे.
त्या कुणा आनंद होतो
कोसळता मी धरेला
सांगा त्यांना आजपासून
ताठ माझी मान आहे.
-भूराम
________🌷________