रविवार, १३ सप्टेंबर, २००९

थडगे एकटे

अनुबीज घर गुंतलो
देहाशी शांत मी निजलो
भगवा वेचून प्राण हा
निर्माण निरखे,... संपलो.

शोकात बुडली ही माया,
थेंब, आसू, ओलस काया,
सुर आरती, तेवे ज्योती,
तेज विरघळे,... दंगलो

मंत्र स्फ़ुटती, ओठ हलती,
लंगडा कृष्ण, दिसे गणपती,
फ़ुल, गंध, धुप, अक्षदा,
उधळल्या हाती,... रंगलो

झाला नश्वर श्वास तो,
झालो ईश्वर भासतो!,
समाधी तळी आता आहे,
थडगे एकटे,... जिंकलो.

-भुराम
९/१३/२००९

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

तो 'घन'- मी 'मन'.

तो मन धुक्याच्यावेळी
स्निग्ध चांदणी झाला.
क्षण आवरता आवरता
तो किती लाघवी आला.

घन-अंधारातून त्याच्या
विश्वात मी कोसळलो.
व्रण थेंब थेंब वाळूचा
कोरडा शोषूनी व्यालो.

मी निळ निळ माथ्याची
ती अशी उधळून देतो.
डोळ्यात, पापणी काठा
तो तसाच बिलगूनी येतो.

मी उठतो पाण्यावरती
तरंग जणू घन-भारी
तो हिरव्या वाटेवरला
प्रवास होई जरतारी.

मी रंग रंग आवराता,
देहात गलथून जातो
तो थेंब थेंब सावरता
ओलावा कलथून देतो.

मी मोह मोह यात्रीचा
वाटेस उलथून देतो.
तो स्नेह स्नेह धात्रीचा
ह्रुदयात उमटून जातो.

ही गर्द धुक्याची वेळ
हां श्वास कोंड़ता वारा
तो घन दाटता भोवती
नयनात मोकळ्या धारा.

तो घन दाटता भोवती
नयनात मुक्तल्या धारा...

-भूराम
०८/२८/०९

सोमवार, १७ ऑगस्ट, २००९

माझ्या जन्माची कहाणी!

आभाळ गांजलेला धूर
निळ्या देहाचा काहूर
चंद्र चांदणी खुशाल
नाही काळजात सुर...

खोल दिठीचा ऊकार
श्वास श्वासांचा निखार
पाय सावलीत गेला
झाला ओसाड तो पार...

माझ्या जन्माची कहाणी
बघ किती केविलवाणी
देह मातीत लोळता
नाळ कापाया ना कोणी...
नाळ कापाया ना कोणी....

-भुराम
८/१५/२००९