शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

भोंडला रे

माझ्या माय मराठीचा
बघ तुटतोय कणा
दमदाटी मांजराची
मला वाघच ते म्हणा
लोकशाही गेली सारी
गटारीत ही वाहून
जीभ ज्याच्या तोंडी
त्याच्या टाळक्यात हाणा.

*

माझ्या माय मराठीचा
किती घुटतोया दम
टाळे देव्हाऱ्या लावून
प्यारी लागे रम छम
साजे भाषा शिवराळ
जणू मधाचे ते पोळ
धुनी बसताच खाली
जनतेच्या नाकी दम.

*

गरगर डोळे काळे 
चष्म्यातुनी आढेवेढे
जिभेला ना त्याच्या हाड
बुडा त्याच्या मोठे गोळे. 
माझ्या माय मराठीने
जीव तेव्हा सोडला रे
जेव्हा चाणक्य राव ते
बाई संगे भांडला रे.

*

माझे दात माझे ओठं
माझे हातावरी पोटं
एक लाखाच ते एक
झालं नागवं मराठं
माझ्या माय मराठीला
आता पेलेना रे घावं
कृष्ण कोण नीती फोल 
कोर्टी कुठं तिला भावं

*

माझ्या माय मराठीचा
किती छळ मांडला रे
बळीराजा रडवेला
कागदाचा भोंडला रे.
ईथे धुरं, तिथे पुरं
निसर्गाचं द्वाड खुरं
करून दाखवण्या नादी 
गरिबालाच कांडला रे  

-भूराम

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

गोड तू

किती गोड तू 
मधु फोड तू
चाफेकळी 
खुळी ओढ तू
त्या जाणिवा 
नित लाघवी
ऱ्हदयात ह्या 
नित जोड तू
ओठांवरी
उन्ह सांडले
डोळ्यातूनी 
खुप भांडले
लाडीक त्या 
होता बटा
हलकेच त्या 
मग सोड तू. 
जाणे तूही 
मम वेदना
शब्दातली
धीट ओळ तू.  
आभाळ हा
झाला खुजा
गडगडूनी
पाडे विजा
भिती माखली
रित मोड तू. 

-भूराम

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

लाह्या आणि बत्तासे.

स्वप्नांत साहिले मी स्वप्नातले उसासे 
काही कुठे मिळाले जगण्यातले दिलासे.

आवाज त्या गतांचा गुणगुणतोय कानी
कुणी कधी न केले जगण्यातले खुलासे 

मी रोज चालतांना मोजे ह्या पावलांना 
थांबून होय काही गुणले कुणा कुणासे 

काळोख हाही होता माझा सखा मनाचा 
गुपित त्या दिसाचे दिले तया जरासे 

आहे अजून देही माझ्याच भावना ह्या 
विचारता कुणी मज सांगा तया बरा-से 

हा देह सोडताना, सोडून काय देऊ
देतोय फक्त आता लाह्या आणि बत्तासे. 


-भुराम