रविवार, २६ मे, २०१९

बघ असणे, असणे होते गं .

तू आली की,
स्पंद नवा गे हो माझा.
तू आली की,
गंध भवाचा हो ताजा.
तू आली की,
स्पर्श सुरांचा होतो ग
तू आली की,
कर्ष स्वरांचा होतो ग
तू आली की,
कळते जगणे ना ओझे
तू आली की,
कळते अवघे जग माझे
**
ह्या अवघ्या शून्य सीमेची
तू केवळ गे आशा
ह्या पोकळ श्वासा मधली
तू ओघळती गे भाषा.
**
तू आली की,
बघ असले, जगणे होते गं
तू आली की,
बघ असणे, असणे होते गं .

-भूराम

नुरे कुणाची

अंगठ्याने ही कोरूनी माती
पदर काठ हा  चावुनी दाती
चुकवुनी नजारा क्षणा क्षणाला
अबोल बोलुनी गेली प्रीती.

थरथर होती ओठा अलगद
गाला छेडे वळणांची बट
ठोका चूकतो हृदयीचा मग
तुझी नजर ती टिपता सावध

लाजेने मग भिजते मीही
स्पंद स्पंद मग सजते मीही
डोळा वेचून टिपूर चांदणे
तुझीच क्षणभर होते मीही

सख्या झुरे मी तुझ्याचसाठी
श्वासांची रव तुझ्याचसाठी
आवेशाची ती घट्ट मिठी दे
मी नुरे कुणाची कुणाचसाठी.

-भुराम