गुरुवार, १६ जून, २०१६

अवघ्या अंधारात

त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
बघत होतो भरकटलेल्या देहाकडे
एका अनोळखी नजरेने जी तुझीही होती
नेहमीच माझ्या वाटेला आलेली.
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
शोधत होतो लामणदिवा पार्वतीच्या हाताने
गणपती तिने सजीव केला
अगदी तश्याच काहीश्या आशेने.
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
कानाने वेचत बाहेरची सारी पडझड
त्याच लयीत होती माझीही धडपड  
कदाचित माणसच असतील विखुरलेली ?
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
आठवत नव्हता भूतकाळ माझा,
आज हा असाच!, उद्या सापडत नव्हता.
थांब थोडी साद घालून रडू दे
*
त्या अवघ्या अंधारात मी जिवंत होतो
डोळ्यांची बुबळ जाणवत होती भिरभिरणारी
श्वासांची फुंकर होती गोड वाटणारी
जिवंत होतो हो खरच की जिवंतच होतो!
*
भूराम
६/१६/२०१६

रविवार, १२ जून, २०१६

वळून तिने बघताच.

जाणिवा जरा थांब तिथं
वळून बघू नको मागं.
पावसाला ही तेच सांगितलय
कोसळून जावू नको मागं.
डोळातल्या त्या ओढीला
ओढून ठेवले आहे जरा,
ऊरातल्या धडधडीला
दडवून ठेवलं आहे जरा.
वळून तिने बघताच
मोकळं सारं होईल.
पाऊस कोसळेल,
उरात धडधडेल,
जणिवांची धावतील
रोमारोमातून साऱ्या
आणि
डोळ्यातलं अगदी
सारं सारं कळेल. …

जाणिवा जरा थांब तिथं
वळून बघू नको मागं.

-भूराम
६/१२/२०१६

शनिवार, ११ जून, २०१६

(3) आठ-ओळ्या..contd...

(२१)
माझे डोळे तुझा श्रिङ्गार
माझे कान तुझा झंकार
माझे ओठ, तुझा अंगार
माझा स्पर्श तुझाच विचार
माझा देह तुझा स्वीकार
जावे अस्तित्वाच्या पार
व्हावा  स्पंद मेघ मल्हार
***
(२२)
ओघळणारे खळखळणारे
खळले डोळ्यांमधले क्षार
गालांवरचे पुसले काही
भिडले ओठांन्ना अलवार
प्राण ओवला अलगद तुटला
क्षण मन मोत्यांचा तो हार
दूर असे अन अता अनोळखी
वेगळाच एक तो अह्नकार
***
-भूराम
६/१२/२०१६