ऋतू बावरी वेडी तुझी ही श्वास बांधील काचोळी
वय जाणते स्पर्शातले मी नाद वेडी पाकोळी.
अंधार हा सादे तुला, शृंगार त्याचा माळूनी
का बावरी वेडीपीशी वाह होतसे त्या पाहुनी!
क्षण जाणवे हा चंद्रही बिलवरी बघ गुंतला
किणकिणकिणे हृद्यांतळी तो नाद वेडा शिंपला.
आभास हे नित लाघवी स्पंदारवी तुज जागवी
कोणि कुठे छेडी उगा पदरास थोडे लाजवी.
घन जाणते बरसणे जसे थेंबातुनी जणु चांदणे
डोळ्यातल्या परिघातले जगणे मिठीत बांधणे.
वारा रुळे मग मल्मली अन उब वाटे गारवा
ह्या चिंब होत्या भाववेळी हा देह होतो काजवा.
-भूराम
३/११/२०१४
माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या प्रयत्नात कविता माझ्या सोबतीला आली.... त्या सोबतीत फुललेल्या काही क्षणांची ही एक पुसटशी नोंद.... (तुमचे अभिप्राय जरूर नोंदवा...)
मंगळवार, ११ मार्च, २०१४
रविवार, ९ मार्च, २०१४
गारपीट
तोडला पाऊस ज्यांनी ओल
त्यांना मागू नका.
चेहरा रक्ताळला ह्या पागलांना
सांगू नका.
गोंदलेला घाव आहे फेकलेला
ना डाव हा.
काळजा ह्या जाळणारे रक्त
आता दाबू नका.
‘आसवांचे षंढ होणे संचितांचे
ह्या भोग हे!’
मूर्ख बाता ह्या तयांच्या भोग
त्यांचे भोगू नका.
जानवे त्यांचीच जी ती फास होती
जाणून घ्या.
सांत्वनांच्या आहुतींची राख
झाली चाखू नका.
पोळला तो सूर्य होता, चांद ही
आहे पोळला.
भाबड्या आशेत आता रात्र सारी
जागू नका.
-भूराम
३/९/२०१४
बुधवार, ५ मार्च, २०१४
.. रात थोडी ..
कधी सांज वेडी होतसे सावली
कधी रात थोडी येतसे पावली
सुखाचीच निद्रा सुखे भोगणे
खुळ्या आठवांना ठेवुनी चाहुली
असे जन्मती स्नेह माझे तुझे
जसे मोहती दुःख माझे तुझे
असे श्वास येती घेवूनी सोडणे
विरत्या क्षणांशी स्पंद माझे तुझे.
केवडा भाव तो, होतसे कल्पना
रुंजी घाले कधी नाद होती खुणा
मंत्रत्या भोवती बांधणे तोडणे
रात्र चंद्रावली उधळू दे वेदना.
काजळातील मी देह हा काजळे
रातदिव्यातळी स्वेद मी हा गळे.
पापण्या जडती, स्वप्नती चांदणे.
ह्या भवातून आता होवू दे वेगळे.
-भूराम
३/५/२०१४
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)