रविवार, २७ डिसेंबर, २००९

गर्द झाल्या प्राकृताशी...

कोण कोणातून आले?
कोण माझे?, कोण झाले?
कातडीशी स्वस्थ होते
कर्दळीचे रंग ओले,

पाउलाशी प्राण मंद,
शर्वरीचा देह धुंद,
बोलता बोलून जातो
निर्झराशी एक थेंब.

पागोळीही स्पदंनांची,
उधळल्यां यौवनाची,
सुर्य होता, चांदणीही,
व्यक्त होत्या दर्पणाची.

आहुती का, दान माझे
भुंकणारे श्वान माझे
गर्द झाल्या प्राकृताशी
पेटलेले रान माझे.

पेटलेले रान माझे...

-भुराम.
१२/२५/२००९

शुक्रवार, २५ डिसेंबर, २००९

विश्व संमोही

गहिवर हिरवा ,
मनी मारवा,
थर थर ओठी
स्निग्ध गारवा.

स्वप्नच ओले
ठेवणीतले,
गर्द नभाशी
उडे पारवा.

नितळ प्रकाशी
जगे उदासी
मलमलीत हे
दुःखच झुलवा.

उलला देह
पडला मोह
विश्व संमोही
खुलवा भुलवा.

-भुराम
[१२/२४/२००९]

गुरुवार, २४ डिसेंबर, २००९

निळसर होती नदी ...

निळसर होती नदी
आभाळ घेवून जगणारी
त्या कोसळत्या सरींसंगे
विमुक्त ढगात उधळणारी....
निळसर होती नदी ...

कळल नाही दुःख तीच
दिसली नाही आसवं,
भावनांचा तो प्रपात,
आठवणींची कासवं...
येता जाता वाटसरूच्या
पावूलात विनये घोटाळणारी
निळसर होती नदी ...
आभाळ होवून जगणारी..

आला खडक, दिली धडक,
कधी ओले डोळे भडक,
गर गर गिरकी, फ़िर फ़िर फ़िरकी,
भोवर्यात येता ओढणारी
निळसर होती नदी ...
आभाळ होवून जगणारी...

आता नाहि गेली कुठे,
दिसे तेही वाटे खोटे
सुकलेल्या लव्हाळीला
लपवू पाही दगड, गोटे.
कुण्या डबक्यात दिसली आसवे!
आणि मासळी तडफडणारी!
निळसर होती नदी ...
आभाळ होवून जगणारी..
निळसर होती नदी ...
आभाळ होवून जगणारी..

-भुराम.
१२/२४/२००९