रविवार, १४ जून, २००९

मुंज

इथे न उरली माती
आभाळची छाती,
हा देह शिवला माझा
गर्द गहिरया राती.

कोण कुणाशी झुंज
आवेशाची मुंज?
सभोवी अक्षता होत्या
मंद तेवत्या ज्योती!

-भूराम
६/१४/२००९

काहूर (पसारा)

अगोदर पोष्ट केलेली "काहूर" कविता , त्यातलीच शब्द पण वेगळ्या अर्थाने..


नाही गं नाही गं उरात काहूर,
चांदण्या बांधल्या आकाशात दूर.

ओलि गं ओलि गं धरतीची काया.
कुणी वेडा जोगी त्याने पेरली गं माया.

बघ ती चकाके धुळ पावूलात,
तुळशीच्या पायी कशी जळते गं वात.

अधाशी मनाचा मांडूनी पसारा,
सांजल्या जगाशी बघ उधळितो वारा.


-भूराम
६/१४/२००९

नियती गं शांत हो तू..

"शोध चिंगारिचा - कवि नाम" वाचून स्फ़ुरलेली कविता

नियती गं शांत हो तू नेणत्या विश्व राती
तु कथा असे सुरांची जाणती मोह माती...

गुरफ़टले अनेक आहे देहातले किनारे
पाउस मोजतांना थेंबांशी चळवळ्णारे
आक्रोश हा कधीचा अस्वस्थ होय हाती
नियती गं शांत हो तू नेणत्या विश्व राती

बांधून ठेवलेले जन्मातले ते उखाणे
जाणून आज घेतो नियतीशी काय घेणे?
चाहूल ती उद्याची नव्हतीच ह्या ललाटी
नियती गं शांत हो तू नेणत्या विश्व राती

काजवे अता उडावे चमकून क्षण काही
पावूले अता पडावे दचकून प्राण होई?
आश्वस्थ मी कधीतर वेदना असे मना ती
नियती गं शांत हो तू नेणत्या विश्व राती

काहूर माजलेले उरात सैर भैर
जिव्हेतळी फ़ुटावी मौनातली अखेर
गुंता असे मनाशी, न गुंतेतली प्रभा ती
नियती गं शांत हो तू नेणत्या विश्व राती.
तु कथा असे सुरांची जाणती मोह माती...

-भूराम

सोमवार, ८ जून, २००९

काहुर


सांजल्या जगाशी उधळला वारा.
गार गार, मंद मंद अंगाला शहारा.

हळूच चकाके बघ धूळ पावूलात.
तुळशीच्या पायी दिसे जळणारी वात.

चाहुली चाहुली एक निशिगंध येई
त्या सभोवास गंध, आणि कुणी नाही

थकलेली तुडवूनी देश प्रांत प्रांत
घरट्यात परतली पाखरे ही शांत

धरती गं सभोवती दिसे ती एकाकी.
रात किड्या किर किर त्याचा तोच भाकी.

दाटले दाट्ले आता उरात काहूर.
चांदण्या बांधल्या दिसे आकाशात दूर.

सरला मनाशी माझ्या कोंडलेला दिस
कुणी पदरात वेडा सांडला पाउस?

-भुराम
६/७/२००९